कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी झालेल्या आंदोलनात माझ्यासह अनेक सहकारी सहभागी झाले होते. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकारच आहे. परंतु 50 टक्केच्या आरक्षण मर्यादेत काही अडचणी आल्या आहेत. यावर महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच आज, मंगळवारी पुकारलेला बंद शांततेत व कोल्हापूरच्या वैभवात भर पाडेल, अशा पध्दतीने करावा, अशी विनंतीही त्यांनी संयोजकांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडीच्या काळात आरक्षण रद्द झाले ? असा आरोप होतोय या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षण रद्द का झाले ? हे सर्वांनाच माहित आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची निरिक्षणे काय आहेत ? हे ही सर्वांना माहित आहे. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल ? हे पाहण्याची गरज आहे. यामध्ये कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही.
जालना येथील आंदोलनस्थळी राज्यातील महत्वाचे नेते जात आहेत ? परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत ? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, रविवारी राज्य सरकारच्यावतीने मंत्री गिरिष महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिष्टाईचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही दुरध्वनीवऊन आंदोलक मनोज जरंगे-पाटील यांच्याशी चर्चा केली. यातून लवकरात लवकर मार्ग निघेल असा विश्वास आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौर्याला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे ? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, स्वातंत्र्य दिनी कोल्हापूरात ध्वजारोहणाला आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी मराठा समाज समन्वयकांना मुंबईत बैठकीचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी समन्वयकांनी आपली भेट घेऊन चर्चा केली. तसेच मंगळवारचा कोल्हापूर बंद व शासकिय पातळीवर मराठा आरक्षण या विषयावर सुऊ असलेल्या विचारमंथनामुळे आंदोलकांचे समाधान होईल व अजित पवार यांची कोल्हापूरातील सभा सुरळित व उच्चांकी होईल, असा विश्वास आहे.








