राज्यभर वणवा : बीडमध्ये तीन आमदारांची घरे पेटविली : कराडमध्ये विराट मोर्चा
प्रतिनिधी/ मुंबई, जालना, बीड, कोल्हापूर
मराठा समाजाला सरसकट कुणबीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी जि. जालना येथे मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी राज्यातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन सुरू केल्याने आरक्षणाचा वणवा राज्यभर पसरला आहे. त्याचे पडसाद उमटत आहे. सोमवारी राज्यभर दगडफेकीबरोबर मराठवाड्यातील तीन आमदारांची घरेही संतप्त कार्यकर्त्यांकडून पेटविण्यात आली. बीडमधील माजलगाव नगरपरिषदेसह राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. कराडमध्ये सरकारच्या छातीत धडकी भरविणारा विराट मोर्चा मराठा समाजाने काढला. मशाल मिरवणूक, मुंडण करून सरकारचा निषेध सुरू असताना राज्यभरात खासदार, आमदार, मंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींना गावबंदीचे सत्रही कायम आहे. जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभ असून सरकारविरोधात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याकडे जाणाऱ्या बहुतांश एसटी बसेसच्या फेऱ्या स्थगित करण्यात आल्या आहेत. तापलेल्या वातावरणात विरोधी पक्षांकडून राज्य सरकारला घेरण्यात येत असून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, फेरविचार याचिका आणि शिंदे समितीच्या मार्गाने हे आरक्षण देणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल करून घेतली. त्या याचिकेद्वारे टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी मराठा समाजाने सरकारला थोडा वेळ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या मनोज जरांगे – पाटील मागणीवर ठाम
जालना : तुम्ही प्रथम अहवाल स्वीकारा नाहीतर दुसरा स्वीकारा, पण राज्यातील मराठा एक आहे. महाराष्ट्रातील मराठा बांधवांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. यासाठी उद्या मंत्रिमंडळात बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. तसेच एकाला प्रमाणपत्र द्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं नाही, अशी आमची इच्छा नाही. सरकारचीही अशी भूमिका असू नये. सरसकट प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मी आंदोलन थांबवणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला आहे.
तीन आमदारांची घरे पेटविली, बीडमध्ये संचारबंदी
बीड : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके, आमदार प्रशांत बंब आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थांना संतप्त आंदोलकांनी आग लावली. त्याचबरोबर बीडमधील राष्ट्रवादीचे कार्यालय देखील पेटवून दिली. संतप्त आंदोलकांनी परिसरातील काही हॉटेल्सनाही आग लावली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बीडमध्ये संचारबंदी लागू केली आहे. प्रारंभी आंदोलकांनी सोळुंके यांच्या घरावर प्रचंड प्रमाणात दगडफेक केली. त्यानंतर घराला आग लावली. घराबाहेर असलेल्या दहा दुचाकींसह चारचाकी वाहनेही पेटवून दिली. त्यामुळे माजलगाव परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. सोळुंके यांच्या पाठोपाठ आमदार प्रशांत बंब आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयांनाही संतप्त आंदोलकांनी आगी लावल्या. जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही पेटविण्यात आले.
राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री शिंदे राज्यपाल रमेश बैस यांना भेटले, सागरवर भाजप नेत्यांची भेट
मराठा आरक्षणाचा वणवा राज्यभर पेटल्यानंतर सरकारमधील राजकीय हालचालींना सोमवारी रात्री प्रचंड वेग आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या भेटीने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू होती. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे राज्यपाल बैस यांना भेटत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक रात्री सुरू झाली. या बैठकीला सर्व बडे नेते उपस्थित होत. तपशील समजू शकला नाही. मात्र राजकीय हालचालींनी चर्चा आणि अफवांना उधाण आले होते.
नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा :
मनोज जरांगे पाटील यांनी ज्यासाठी उपोषणासारखे हत्यार उपसले, ती कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. मराठ्यांकडील नोंदी पाहून त्यांना उद्यापासूनच कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. मात्र मराठ्यांचे आंदोलन भरकटत चालले आहे. त्याबाबत मनोज जरांगे-पाटील, त्यांचे समर्थक आणि सकल मराठा समाजाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना मिळणारी सहानुभूती कमी होईल, अशीच चिंताही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.









