ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही
रत्नागिरी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक युद्ध सुरू झाले आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे ठाम आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
मराठा समाजाला मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाच्या तरुेणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
रत्नागिरी येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. सरकार सर्व समाजांना न्याय देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. मंत्रिमंडळात ‘गँगवॉर’ असल्याच्या आरोपांना त्यांनी ‘तथ्यहिन’ म्हटले. यापूर्वी विरोधकांनी केलेले राजकीय भाकित खरे ठरले आहे का? उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणार, असे म्हटले होते, पण ते जिंकले का? या आरोपांवर लक्ष केंद्रित होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे निराधार आरोप केले जात आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील समन्वयाबद्दल बोलताना सामंत म्हणाले, त्यांच्यात कोणताही वाद नाही. आमच्यातील युतीमध्ये समन्वय नाही, ही केवळ विरोधकांकडून पसरवली जाणारी बातमी आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात खूप चांगला समन्वय आहे.
नगरविकास खात्यासंदर्भात फडणवीस कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यात कोणताही वाद नसून ‘युतीमध्ये समन्वय नाही’ ही बातमी विरोधकांकडून पसरवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी भारत–पाकिस्तान सामन्यावर केलेल्या टीकेला सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्याने यासंदर्भात भूमिका मांडली आहे, असे सांगत सामंत म्हणाले की, यावर आक्षेप घेणे म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेण्यासारखे आहे. सिंदूरवर आक्षेप घेणे, ही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका नसून ती सैन्यावर टीका असते, असे त्यांनी स्पष्ट केले.








