संजीव खाडे, कोल्हापूर
Jalna Lathi Charge : जालना येथे लोकशाही मार्गाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीचार्ज करताना छऱ्यांच्या बंदुकीचाही वापर केला.यामध्ये असंख्य आंदोलक जखमी झाले. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत असताना राज्य सरकारने मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.या तप्त वातावरणात मराठा क्रांती मोर्चाने राज्यातील प्रत्येक तालुका, जिल्हानिहाय वकिलांच्या समिती स्थापन करण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे.या समितीच्या माध्यमातून गुन्हे दाखल झालेल्या मराठा आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येणार आहे.उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने-शिंदे यांनी केलेल्या सुचनेनंतर मराठा क्रांती मोर्चाने पुढाकार घेतला आहे.
जालन्यातील घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चातील मुंबईतील समन्वयकांनी रविवारी ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने-शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आंदोलकांवर झालेल्या अन्याय,अत्याचाराची आणि मारहाणीची माहिती दिली.अमानुष अत्याचार केल्यानंतर राज्य सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचेही सांगितले.तसेच कायदेशीर मदत करण्याचे आवाहनही माने-शिंदे यांना केले.यावेळी माने-शिंदे यांनी प्रक्षोभक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार कडून करण्यात येते या गंभीर गोष्टी टाळण्यासाठी राज्यातील जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी अशा आंदोलकांना कायमस्वरूपी मोफत कायदेशीर मदत मिळण्यासाठी वकिलांची समिती गरजेची असल्याचे मत मांडले. तसेच अशा समित्यांची स्थापना करण्याचे आवाहन देखील माने-शिंदे यांनी केले.
या समितीचा पहिला सभासद म्हणून त्यांनी स्वत: नाव नोंदवित असल्याचेही त्यांनी जाहीर केले.याआधी सुद्धा ज्या ज्या वेळी मराठा समाजाच्या आंदोलनास कायदेशीर गरज भासली आहे त्या त्या वेळी माने-शिंदे यांनी त्यांच्या संपूर्ण टीम सोबत मराठा समाजाला मदत केली आहे व आता अशाप्रकारे मराठा समाजातील वकिलांनी स्वत:हून पुढे येऊन कायम स्वरूपी समिती स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.माने-शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे त्यासाठी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रतर्फे आम्ही त्यांचे कायम ऋणी आहोत, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार (मुंबई) यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.
मराठा समाजासाठी लढताना,आंदोलन करताना गुन्हे दाखल झालेल्या मराठा कार्यकर्त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली मराठा वकिलांनी एकत्रित यावे,तालुका, जिल्हास्तरावर समिती स्थापन करावी.स्थानिक स्तरावरील न्यायालयात त्यांनी मदत करावी,उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मदत करण्यासाठी मी आणि माझी टीम तयार आहे.
-सतीश माने-शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय
जालना जिल्ह्यातील आंदोलनात मराठा आंदोलकांवर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत,ते गंभीर आहेत.यापुढे राज्यातील कोणत्याही आंदोलनातील मराठा कार्यकर्त्यांना स्थानिक स्तरावर मोफत कायदेशीर मदत मिळणे आवश्यक आहे,त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने-शिंदे यांनी केलेल्या सुचनेनुसार तालुका,जिल्हास्तरावर वकिलांची समिती स्थापनेसाठी स्थानिक मराठा वकिलांनी पुढाकारा घ्यावा.
-वीरेंद्र पवार, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा (मुंबई)








