रुळावर जाळले टायर: उस्मानाबाद स्थानकात पुणे-हरंगुळ एक्स्प्रेस थांबवली
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवांनी सुरू केलेले आंदोलन दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. राज्यात विविध ठिकाणी जवळपास मागील तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आरक्षणाचे आंदोलन सुरू ठेवले आहे. सोलापुरातही मंगळवारी आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी मंगळवारी पुण्याहून सोलापूरकडे येणारी मालगाडी रेल्वे अडवून आंदोलन केले. तसेच रेल्वे रुळावर टायर जाळत सरकारचा निषेध केला. त्यामुळे बराच वेळ कार्यकर्त्यांनी याठिकाणी मालगाडी अडवली होती.
राज्यातील इतर भागांप्रमाणेच सोलापुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन चांगलेच पेटले आहे. सोलापुरात आंदोलक गेल्या काही दिवसांपासून रोज विविध प्रकारे आंदोलन करून सरकारसमोर त्यांची मागणी मांडत आहे. सरकारचा निषेध करत मुंडन, टायर जाळून निषेध, एसटी बस पेटविली अशा विविध प्रकारे आंदोलन केल्यानंतर सोमवारी मराठाक्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुण्याहून सोलापूर येथे येणारी रेल्वे निराळे वस्ती येथे अडवली. आंदोलन सुरू होऊन बराच कालावधी झाले तरी सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काहीही ठोस भूमिका घेण्यास तयार नाही. त्याचा राग व्यक्त करत मंगळवारी रेल रोको करण्यात आला. यावेळी मारुती सुरवसे, निशांत सावळे, श्रीनिकेत सुरवसे आदी मराठा क्रांती मोर्चाचे व मराठा समाजबांधव उपस्थित होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी सकाळी 11.20 वाजता गाडी क्रमांक 01487 पुणे-हरंगुळ एक्स्प्रेस उस्मानाबाद स्थानकावर येताच मराठा समाजाने गाडी थांबवली आणि सुमारे 100 ते 150 समर्थक ट्रेनच्या समोरच्या रुळावर बसले होते. त्यामुळे उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर काही काळ गाडी थांबवण्यात आली होती.
ठळक बाबी……
– मराठा आंदोलकांनी निराळे वस्ती येथे अडविली मालगाडी रेल्वे
– दुपारी साडेबारा वाजताची घटना
– घटनास्थळावरून आंदोलकांना आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांनी केले बाजूला
– त्यानंतर दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी निराळे वस्ती येथून मालगाडी सोलापूर स्टेशनकडे झाली रवाना
– रेल्वे ट्रॅकवर व स्टेशन परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाढविली पोलिसांची गस्त
सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्के आरक्षण द्यावे आणि समस्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्ताधारी आमदार, खासदार व विरोधी पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून नग्न करू. अजूनही वेळ गेली नाही मराठ्यांच्या युवकांचा अंत पाहू नका याचे परिणाम गंभीर होतील.
– राम जाधव, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर