खानापूर : खानापूर तालुका मराठी संस्कृती व भाषा जिवंत ठेवण्यासाठी तसेच विकास साधण्यासाठी म. ए. समितीची गरज आहे. विरोधकांनी कितीही आमिषे दाखविली तरी मराठी जनतेने आपला स्वाभिमान जागृत ठेवून समितीला विजयी करा, समितीबद्दल अपप्रचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन अॅड. आय. आर. घाडी यांनी समिती उमेदवार मुरलीधर पाटील यांना मराठा परिषद, वकील संघटना आणि कुस्तीगीर संघटनांच्यावतीने पाठिंबा जाहीर करताना व्यक्त केले. क्षत्रिय मराठा परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मुरलीधर पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिलीप पवार होते. मुरलीधर पाटील आणि अभिलाष देसाई यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संयुक्त महाराष्टाच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. यानंतर तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समितीला पाठिंबा व्यक्त करणारी भाषणे झाली. दिलीप पवार म्हणाले, आम्ही गेल्या 50 वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आहोत. हे कार्य करीत असताना समितीला मारक होईल, असे कार्य कधीच आमच्या हातून घडलेले नाही. मात्र काही लोक समितीतून निवडून येऊन समितीच्या विरोधात कार्यरत आहेत. त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मराठी जनतेने एकीची वज्रमूठ केली पाहिजे आणि मुरलीधर पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी केले पाहिजे. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, प्रकाश चव्हाण, सीताराम बेडरे, आबासाहेब दळवी, केशव कळळेकर, आनंद देसाई, अर्जुन देसाई, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव कदम, रामचंद्र खांबले, सुरेश पाटील, राजाराम देसाई, कॅ. चांगाप्पा पाटील, तानाजी कदम, सचिव रमेश पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समितीला देणगी
चांगाप्पा कदम क्षत्रिय मराठा परिषद, अॅड. आय. आर. घाडी यांनी प्रत्येकी 11 हजार, तानाजी कदम 51000, तानाजी पाटील 15511, सुरेश पाटील, कृष्णा पाटील जनसेवा फौंडेशन यांनी प्रत्येकी 5 हजार यासह अन्य कार्यकर्त्यांनी समितीला आर्थिक मदत केली.









