► प्रतिनिधी / बेळगाव
मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान संस्थेतर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यानंतर लेझीम, लाठी, काठी, ढोल–ताशा दांडपट्टा, फुगडी, दिंडी यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, वासुदेव, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, आण्णाजी दत्तो या पात्रांची भूमिका उत्कृष्टपणे वठविली. विद्यार्थ्यांनी शिवकालीन पारंपरिक वेशभूषा करून या कार्यक्रमाला उठाव आणला.
सुमन पिंगट आणि अनुजा राक्षे, सर्वेश या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य रवी सुर्यवंशी यांनी आपले विचार व्यक्त केले. पीयुच्या प्राचार्य ज्योती, इंग्लीश माध्यमाच्या प्राचार्य गायत्री सुर्यवंशी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर हे उपस्थित होते.
साक्षी पाटील हिने प्रेरणा मंत्र सादर केला. सूत्रसंचालन वैभवलक्ष्मी मंडोळकर यांनी केले.









