संस्थेकडून 68 उपक्रम, कार्यशाळा-सेमिनारचे आयोजन
बेळगाव : येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजला इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलने 3.5 इतकी गुणवत्ता श्रेणी प्रदान केली आहे. कर्नाटकातील इंजिनिअरिंग, मेडिकल, एमबीए, पॉलिटेक्निक व अन्य पदवी कॉलेजमध्ये ही सर्वाधिक उच्चत्तम श्रेणी आहे. सदर संस्था एकूण 4 स्टार्स देते. त्यामध्ये 3.5 ही गुणवत्ता अधिक आहे. 23 जानेवारी रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला. संस्थेने एकूण 68 उपक्रम, कार्यशाळा व सेमिनारचे आयोजन केले. या सर्वांना आयआयसीने पूर्ण मान्यता दिली. इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक व मराठा मंडळच्या आयआयसीचे अध्यक्ष डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की, या प्रकल्पादरम्यान आम्ही 25 हून अधिक संकल्पना अंमलात आणल्या, तज्ञांकडून प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या. संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी सांगितले की, भारताला स्वयंपूर्ण करावयाचे असल्यास उद्योग क्षेत्रातील नवनवीन संकल्पना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी तुम्ही अभियांत्रिकीची जोड देता तेव्हा निश्चितच त्याचा दर्जा वाढतो. संस्थेने वर्षभर राबविलेल्या उपक्रमांसाठी डॉ. शुभा बरावणी, प्रा. रेवणसिद्धप्पा, प्रा. जमादार, प्रा. बिद्री, प्रा. सुधा व प्रा. मारीगेरी यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल मराठा मंडळाच्या व्यवस्थापन मंडळाने या सर्वांचे अभिनंदन केले आहे.









