पुणे / प्रतिनिधी :
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, या मागणीकरिता बुधवारी क्रांतीदिनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी येथे दिला.
या पत्रकार परिषदेला मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, मराठा महासंघाचे अनिल ताडगे, संतोष नानवटे, वंचित बहुजन आघाडीचे प्रफुल्ल गुजर, विठ्ठल पवार, मयूर गुजर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध जाती-धर्माच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करून सद्य:स्थितीत देण्यात येणारे शैक्षणिक व नोकरीतील विविध प्रवर्गासाठीच्या आरक्षणाच्या टक्केवारीचे पुनर्विलोकन करावे. गायकवाड आयोगाच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने कायदा करून तसेच ओ.बी.सी. प्रवर्गातील जातींच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करून 50 टक्क्याच्या आतील आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने करावी, ओबीसी प्रवर्गातील जातींचे फेरसर्वेक्षण, ओबीसी जातींची संख्या व लोकसंख्येची जनगणना करून सर्वेक्षणात प्रगत जातींना वगळून फक्त मागास ठरणाऱ्या जातींना लोकसंख्येच्या 50 टक्के आरक्षण लागू करावे, पीएसआय -2017 राज्यसेवा 2017 आरटीओ 2017 मधील महिलांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजातील आमदारांचा निषेधही नोंदवण्यात येणार आहे. मागणी मान्य न झाल्यास पुढील दिशा ठरवण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.