सुवर्ण विधानसौधसमोर उद्या आंदोलन : आमदार अनिल बेनके यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे या समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे मराठा समाजाला ‘3 बी मधून 2 ए’ मध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी कर्नाटकातील मराठा समाज एकवटणार आहे. मंगळवार दि. 20 रोजी सकाळी 10 वा. सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन केले जाणार असून आरक्षणाची मागणी लावून धरली जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल बेनके यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील 25 वर्षांपासून लढा दिला जात आहे. परंतु आतापर्यंत मागणी मान्य झालेली नाही. आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदने देऊन मागणी करण्यात आली आहे. परंतु या समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी आहे.
त्यामुळे येत्या अधिवेशन काळात उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, धारवाड, कारवार, बागलकोट येथील मराठा समाज मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचे सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांनी सांगितले. विनय कदम म्हणाले 3 बी मधून 2 ए मध्ये आरक्षणासोबतच सुवर्णसौधसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाला प्राधान्य द्यावे, राज्यसभेसाठीची एक जागा ज्येष्ठ मराठा नेत्याला द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली जाणार आहे. बेंगळूर येथील मराठा समाजाचे स्वामिजी मंजुनाथ भारती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे.
मराठा आमदार आवाज उठविणार
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधानसभा व विधान परिषदेतील सर्व मराठा आमदार आवाज उठविणार आहेत. यासाठी सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे. उत्तर कर्नाटकात मराठा समाजाचे प्राबल्य अधिक असल्याने हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला जाईल, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली. यावेळी वैभव कदम, धनंजय जाधव, महेश रेडेकर यासह इतर उपस्थित होते.









