सुळगा (हिं.) येथील बैठकीत मराठा समाजाच्या नागरिकांना मार्गदर्शन
वार्ताहर/उचगाव
इतर जातीधर्माचे लोक स्वत:च्या हक्कासाठी एकत्र येतात. मात्र आपला मराठी समाज एकत्र येत नाही. ही मोठी खंत आहे. आपली संस्कृती, धर्म, परंपरा टिकविण्यासाठी मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. सध्या जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. यावेळी आपला धर्म-हिंदू, जात-मराठा, पोटजात-कुणबी आणि मातृभाषा-मराठी याचा उल्लेख माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसमोर सतर्क राहून करा, असा मौलिक सल्ला बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांनी दिला. समस्त सकल मराठा समाज बेळगाव ग्रामीणतर्फे रविवारी सुळगा (हिं.) येथील लावण्यवेल मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सोमवारी राज्य मागासवर्ग आयोग सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षण जातनिहाय जनगणना या संदर्भात तालुक्यातील ग्रामीण जातनिहाय जनगणना मराठी समाजाच्या नागरिकांची बैठक बोलावली होती. यावेळी नागेश देसाई म्हणाले, बेंगळूर येथे झालेल्या समस्त सकल मराठी समाजाच्या बैठकीमध्ये जातनिहाय जनगणना या संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये एकूण 60 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याबाबत व्यवस्थित नागरिकांना माहिती दिली पाहिजे. मात्र यामध्ये आठ, नऊ, दहा आणि पंधरा जे क्रमांक आहेत. हे अतिशय महत्त्वाचे असून त्याची योग्यप्रकारे माहिती देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.
जनगणनेत सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे
यावेळी अॅड. नामदेव मोरे म्हणाले, मराठी, कुणबी हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. खरंतर पूर्वी कुलवाडी असा उल्लेख मराठी लोकांना करण्यात येत होता. मात्र तो कमी दर्जाचा समजून लोकांनी त्याच्यात बदल करत गेले. कर्नाटकामध्ये आज 80 लाख मराठा आहेत. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आता होणाऱ्या या जनगणनेत सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. मथुरा तेरसे, डी. बी. पाटील, महादेव कंग्राळकर, मनोहर बांडगे, ईराप्पा खांडेकर, गुरुनाथ पाटील, वैजू गोजगेकरसह अनेकांनी विचार व्यक्त केले. बैठकीला बाळू देसूरकर, बाळकृष्ण तेरसे, यल्लाप्पा बेळगावकर, विठ्ठल देसाई, जयवंत बाळेकुंद्रीसह मान्यवर, मराठी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार नारायण शहापूरकर यांनी केले.









