आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडुन युद्धपातळीवर काम
कोल्हापूर प्रतिनिधी
मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या मुदतीपुर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरु असल्याचेही खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले.
खासदार महाडिक म्हणाले, मराठा समाजाला खऱ्या अर्थाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. मात्र सरकार बदलल्यानंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. यानतंरही महायुतीच्या सरकारने सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी, तरुण-तरुणी यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या विरोधक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत करत असलेली वक्तव्ये साफ खोटी आहेत. देशातील पाच राज्यात लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पक्षाने प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. नियोजनानुसार ते या राज्यात जातात पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि लगेच पुन्हा महाराष्ट्रात येवून येथील कामे करतात. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे खरचं आजारी असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीपुर्वीच मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नक्की मार्गी लागेल. सध्या 20 हजार जणांचे कुणबी दाखले तयार आहेत. डिसेंबरअखेर 1 लाख मराठा बांधवांना दाखले मिळतील. आरक्षणासाठीचे काम युद्धपातळीवर सुरु असून मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण महायुतीचे सरकार नक्की देईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
पुढील 15 वर्ष महायुतीचेच सरकार
डिसेंबर अखेरीस राज्यातील सरकार पडेल असे वक्तव खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्याबाबत बोलताना खासदार महाडिक म्हणाले, असे कोणी म्हटले म्हणून सरकार पडत नाही. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे महायुतीचे हे सरकार भक्कम झाले आहे. राज्यात पुढील 15 वर्ष महायुतीचेच सरकार सत्तेत राहिल, असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.









