आमदार अशोकराव माने यांना दिल्यास मराठा समाजामध्ये मोठा उद्रेक होईल
कोल्हापूर : आमदार अशोकराव माने यांचा कोल्हापूरशी कोणताच संबंध नाही. ही जागा त्यांना पक्षात येण्यासाठीच दिली आहे. यामुळे सरकारने मराठा समाजावर मोठा अन्याय केला आहे. ही जागा आमदार अशोकराव माने यांना दिल्यास मराठा समाजामध्ये मोठा उद्रेक होईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आला.
मराठा समाजाच्या भवनसाठी ही जागा मिळावी, यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता त्या जागेवर जमा होण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारने आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले ओद्योगिक संस्थेला मंगळवार पेठेतील विश्वपंढरी येथील जागा मंजूर करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या भवनसाठी जागा न देता आमदार माने यांना देण्यात आल्याने, मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा भवनसाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये, अखिल भरातीय मराठा महासंघाची बैठक झाली. या बैठकीत अनेक मान्यवरांनी मराठा समाजाच्या भावनांची हत्या झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. ही जागा मराठा भवनसाठीच मिळावी, यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
तसेच मंगळवारी त्या जागेवर जाण्याचा निर्णंय ही घेण्यात आला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, मराठा स्वराज्य भवनसाठी समाजातील लोकांनी वर्गणी गोळा केली आहे. पण कोल्हापूरशी कोणताही संबंध नसताना आमदार अशोकराव माने यांना मंगळवार पेठेतील विश्वपंढरी येथील जागा कशी दिली? मराठा समाज भवन उभा करण्यासाठी समाजाकडून रक्ताचे पाणी केले जात असताना बाहेरील आमदार असलेल्या माने यांना ही जागा कशी दिली? हा प्रश्न अनुतरीत आहे. ही जागा मराठा भवनसाठीच मिळावी.
आमदार अशोकराव माने यांनी शिरोळ तालुक्यामध्ये अनेक घोटाळे केले आहेत. त्यांनां ही जागा भ्रष्टाचारासाठीच हवी असल्याचे मत चंद्रकांत खोंद्रें यांनी व्यक्त केले. मंगळवार पेठेतील जागेवर कंपाऊंड मारून, मराठा भवनाचा बोर्ड लावण्याची सूचना वैशाली महाडिक यांनी केली. तर नीलम मोरे यानीं हा ठराव मांडताना स्थानिक आमदार, मंत्री कोठे होते असा प्रश्न केला.
यावेळी शैलजा भोसले, प्रकाश पाटील, मिलींद ढवळे पाटील, सुनिल पाटील, शंकरराव शेळके, महेश जाधव, दिपक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शशिकांत पाटील, अवधुत पाटील, उतम जाधव, विजय काकोडकर, उदय देसाई, आदीसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करणार
राज्य सरकारने या जागेचा ठराव कसा मंजूर केला? मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा एक डाव आहे. या जागेवर मराठा स्वराज्य भवनाचा बोर्ड लावण्याचा इशारा माजी महापौर सागर चव्हाण यांनी यावेळी दिला. आमदार माने यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणूनच ही जागा त्यांना देण्यात आल्याचा आरोप दिलीप देसाई यांनी केला. ही जागा राजर्षी शाहू महाराज यांची असून याबाबतची कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू असून, लवकरच आपण कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये या जागेबाबत याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.








