पैंगीणच्या गजानन बांदेकरांकडून चतुर्थीची आकर्षक सजावट, वैशिष्टय़पूर्ण माटोळी
प्रतिनिधी /काणकोण
पैंगीण येथील गजानन बांदेकर यांनी यंदा देखील आपल्या गणेशमूर्तीजवळ पर्यावरणास पूरक आणि आकर्षक अशी सजावट केर्लीं असून वैशिष्टय़पूर्ण माटोळी बनवली आहे. गोव्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सीमेलगतच्या भागांत जाऊन दुर्मिळ फळे आणि माटोळीचे साहित्य गोळा करतानाच त्यांचा परिचय पंचक्रोशीतील लोकांना करून देणे, या फळांचा वैद्यकीयदृष्टय़ा वापर कसा होतो त्याचीही माहिती करून देणे हे काम मागच्या बऱयाच वर्षांपासून बांदेकर करत आलेले आहेत.
यंदा त्यांनी सुंदर माटोळी बनवितानाच संत गोरा कुंभाराचा स्वयंचलित देखावा बनविला आहे. त्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून गाजर, मुळा, हिरव्या रंगाच्या शेंगा वापरून तिरंगा साकारला आहे, तर मसूर दाळ, साबुदाणा आणि मुगाचा वापर करून भारताचा नकाशा तयार केला आहे. बांदेकर यांनी यापूर्वी बऱयाच वेळा कला आणि संस्कृती खात्याच्या माटोळी स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके पटकावलेली आहेत.









