वृत्तसंस्था / रायपूर
‘77 ठार’ अशी ओळख असलेला माओवाद्यांचा म्होरक्या महेश कोरसा याला चकमकीत कंठस्नान घालण्यात आले आहे. कोरसा हा आधुनिक स्फोटके पेरण्यात, तसेच त्यांचे अचूकपणे स्फोट घडवून आणण्यात तज्ञ मानला जात होता. त्याने आजवर अनेक सुरक्षा सैनिकांच्या हत्या केलेल्या आहेत. त्यामुळेच त्याला ‘77 ठार’ अशी ओळख मिळाली होती. त्याच्या तीन सहकाऱ्यांनाही गेल्या आठवड्यात यमसदनी धाडण्यात आले आहे. ही माहिती मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.
2017 मध्ये त्याने घडविलेल्या स्फोटात 15 सुरक्षा सैनिकांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये त्याने 17 सुरक्षा सैनिकांचे, तर 2021 मध्ये त्याच्या हल्ल्यात 22 सुरक्षा सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तो सुरक्षा व्यवस्थेसमोरचे एक मोठे आव्हान बनला होता. पूर्वी अनेकदा तो पोलिसांच्या तावडीत सापडता सापडता बचावला होता. पण यावेळी मात्र, सुरक्षा सैनिकांनी त्याला जाळ्यात अडकवले. त्याला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, त्याने ते न जुमानता गोळीबार सुरु केल्याने तसेच प्रत्युत्तर द्यावे लागले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
माओवादी संघटनेचा संघटक
कोसरा हा लिबरेशन गुरिल्ला आर्मी या माओवादी संघटनेचा संघटक होता. ही संघटना भारतीय साम्यवादी पक्ष (माओवादी) या संघटनेची सशस्त्र शाखा आहे. मूळच्या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही तिचे कार्य लिबरेशन गुरील्ला आर्मीच्या माध्यमातून होत आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांना भोसकल्याचा आरोप
कोसरा हा मूळचा बिजापूर जिल्ह्dयातील असून त्याने अनेक तरुणांना उग्र माओवादाच्या नादी लावले होते. 2010 पासून त्याची या भागात दहशत होती. 2017 मध्ये त्याने आधुनिक स्फोटके हाताळण्याचे आणि त्यांचा स्फोट करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते. तेव्हापासून छत्तीसगडमध्ये झालेल्या जवळपास सर्व बॉबस्फोटांमध्ये त्याचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.









