जिल्ह्याच्या विकासाला बसली खीळ : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, केवळ सहा शहरांना कनेक्टीव्हिटी
बेळगाव : बेळगाव विमानतळावरील अनेक शहरांच्या सेवा कमी झाल्यामुळे प्रवाशांची संख्याही मंदावली आहे. उडान योजनेतील विमान फेऱ्या कमी झाल्याने याचा मोठा फटका विमानतळाला बसला आहे. सध्या केवळ सहा शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह बेळगावच्या विकासाला याचा जोरदार दणका बसला असून लोकप्रतिनिधींनी याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती ओढवल्याची स्थिती आहे. बेळगाव जिल्ह्यातून यापूर्वी 12 ते 13 शहरांना विमानसेवा दिली जात होती. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद, पुणे, नागपूर, अहमदाबाद, इंदोर, जयपूर, तिरुपती, म्हैसूर, कडाप्पा या शहरांना विमानसेवा सुरू होती. परंतु उडान-2 योजनेचा कालावधी संपल्याने यापैकी बऱ्याचशा विमानफेऱ्या बंद करण्यात आल्या. उडान योजनेमुळे नागरिकांना कमी तिकीट दरात विमानाचा प्रवास करता येत होता.
एकामागून एक सेवा बंद होत गेल्या. चेन्नई, पुणे, नागपूर, कडाप्पा, तिरुपती, म्हैसूर, इंदोर या शहरांच्या सेवा टप्प्याटप्प्याने बंद झाल्या. सध्या बेंगळूर, मुंबई, दिल्ली व हैदराबाद या चार शहरांना दैनंदिन सेवा सुरू आहे. उर्वरित अहमदाबाद व जयपूर या शहरांना आठवड्यातील तीन दिवस विमानसेवा दिली जात आहे. प्रवाशांची मागणी असूनदेखील विमानसेवा बंद करण्यात येत आहेत. विमानफेऱ्या कमी झाल्याने याचा परिणाम उद्योग व्यवसायावर दिसून येत आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून उद्योजकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागला. बेळगाव विमानतळ हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या मध्यावर असल्याने प्रवाशांमधून मागणी होती. परंतु बाजूच्या हुबळी विमानतळाला नेहमीच प्राधान्य देण्यात आल्याने बेळगावचे मोठे नुकसान झाले. तसेच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून आला आहे.
सध्या उपलब्ध असलेली सेवा
बेंगळूर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद
पुणे, चेन्नई विमानसेवेसाठीचा प्रस्ताव
कोरोनापूर्वी बेळगावमधून पुणे शहराला एअर इंडियाची अलायन्स एअर विमानसेवा देत होती. परंतु उडान योजनेचा कालावधी संपुष्टात आल्याने ही सेवा बंद झाली. ही सेवा पूर्ववत व्हावी यासाठी अनेकांनी मागणी केली होती. त्यानुसार पुणे व चेन्नई या दोन शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून याला मंजुरी मिळण्याचीही शक्यता आहे.
बेंगळूर, दिल्ली शहरांना उत्तम प्रवासी
बेळगावमधून बेंगळूर व दिल्ली या दोन शहरांना प्रवासी संख्या उत्तम आहे. 75 ते 80 टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. अजून काही नवीन शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला असून कोणत्या शहरांना विमान कंपन्या पसंती देतात हे पहावे लागणार आहे
– त्यागराजन (संचालक बेळगाव विमानतळ)









