मोदी सरकार पूर्णपणे अपयशी : काँग्रेस कार्यकारिणी बैठकीदरम्यान अध्यक्ष खर्गेंचा आरोप
वृत्तसंस्था /हैदराबाद
काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक शनिवारी, 16 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये सुरू झाली. गेल्या महिन्यात नवीन ‘सीडब्ल्यूसी’ स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महागाई, बेरोजगारी, मणिपूर हिंसाचार आणि विषमता रोखण्याच्या मुद्यांवर मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा दावा करत देश अनेक अंतर्गत आव्हानांचा सामना करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच इंडियन नॅशनल इन्क्लुझिव्ह अलायन्सला (इंडिया) मिळत असलेल्या यशामुळे मोदी सरकार विरोधी पक्षांवर कारवाई करण्यात व्यस्त आहे, असेही खर्गे म्हणाले.
काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यकारिणी बैठकीला शनिवारपासून हैदराबादमध्ये प्रारंभ झाला. प्रथमच ही बैठक दिल्लीबाहेर होत असल्याने त्यात पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभलेली आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. बैठकीत आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत अनेक टप्प्यांत चर्चा होणार आहे. अलीकडील हिंसक घटनांमुळे भारताच्या आधुनिक, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसला आहे. भाजप आगीत तेल ओतण्याचे काम करत असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे शनिवारी बैठकीदरम्यान म्हणाले. काँग्रेसने आपल्या महान देशात लोकशाही, सामाजिक न्याय, प्रगती आणि समतेसाठी लढा दिला आहे. देशाच्या अखंडतेसाठी आम्ही लढत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होत असल्याने देशाची अर्थव्यवस्थाही धोक्मयात आल्याचेही ते पुढे म्हणाले.
तेलंगणाच्या विकासासाठी…
काँग्रेस नेहमीच तेलंगणातील लोकांच्या बाजूने उभी राहिली आहे. राज्याला प्रगतीच्या नव्या टप्प्यावर नेण्याची हीच वेळ आहे. तेलंगण आणि देशाच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणी सज्ज झाली असल्याचे ट्विट बैठकीपूर्वी माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच कार्यकारिणीची बैठक दिल्लीबाहेर होत आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती होताच भारत राष्ट्रवादी समिती (बीआरएस) सत्तेत कशी आली हे लोकांना माहीत आहे. तेलंगणा सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य आहे. येथील जनता सरकारला कंटाळली आहे. तेलंगणातील जनतेला आम्ही 6 हमीभाव देऊ. येथील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज असल्याचे काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले.
भारतीय राजकारणात काँग्रेसची भूमिका मोठी आहे. कार्यकारिणीची बैठक म्हणजे देशाच्या सध्याच्या प्रश्नांवर चर्चा करून पुढील लढाईसाठी सज्ज होण्याची संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी केले आहे. तर, तेलंगणा ही आमची जुनी भूमी आहे. या भूमीतून काँग्रेसला नेहमीच बळ मिळाले आहे. आता पुन्हा राज्यात आमची ताकद दाखवून देऊ, असा आशावाद काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केला.
विशेष अधिवेशनात सावध रहा!
पुनर्गठित काँग्रेस कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत खर्गे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या इराद्यांबद्दल सावध करताना संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा संदर्भ दिला. गेल्या दशकापासून काँग्रेस मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन करून पक्षाने नरेंद्र मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडल्याचेही सांगितले. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि अन्न सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये समाजातील वंचित घटकांच्या हक्कांचे रक्षण केले जाईल याची खात्री करण्याची पक्षाची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
आज देशाला अनेक गंभीर अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मणिपूरमधील हृदयद्रावक घटना संपूर्ण जगाने पाहिल्या. मे महिन्यापासून तेथे हिंसाचार सुरू आहे. मणिपूर हिंसाचाराची आग हरियाणातील नूहपर्यंत पोहोचण्यात मोदी सरकारचा हात आहे. या घटनांमुळे ठिकठिकाणी हिंसाचार झाला. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत जातीय तणाव पसरला, असा आरोप खर्गे यांनी केला. या घटनांमुळे आधुनिक, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष भारताची प्रतिमा मलिन होत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्ष, जातीयवादी संघटना आणि प्रसारमाध्यमे या आगीत तेल ओतत आहेत. त्यामुळे देशाची धर्मनिरपेक्ष जडणघडण उद्ध्वस्त होत आहे. त्यासाठीच आपण एकत्र येणे गरजेचे असल्याचे खर्गे यांनी सांगितले.









