काँग्रेस विरोधात मोर्चा काढून भाजपकडून निदर्शने
बेळगाव : काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांना असलेल्या योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून तातडीने त्या योजना सुरू कराव्यात. यासह इतर मागण्यांसाठी भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून काँग्रेस सरकार विरोधात निवेदन दिले. यावेळी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. भाजप सरकार असताना वीजपुरवठा सुरळीत होत होता. मात्र काँग्रेस सरकार सत्तेवर येताच विजेची समस्या गंभीर बनत चालली आहे. रात्रीच्यावेळी केवळ दोन ते तीन तास थ्रीफेज वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. दुष्काळ पडला आहे. मात्र सरकारला याबाबत कोणतीच काळजी नाही, असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला. भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजना लागू केल्या होत्या. त्या सर्व योजना काँग्रेस सरकारने बंद केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला जीवन जगणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने या सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करून काँग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार ईराण्णा कडाडी, अॅड. एम. जी. जिरली, माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, धनंजय जाधव व शेतकरी उपस्थित होते.









