वृत्तसंस्था / भानुप्रतापपूर
छत्तीसगड राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात अनेक विनामूल्य बाबींची आश्वासने देण्यात आली आहेत. केजी ते पीजी शिक्षण सर्वांना विनामूल्य, जातीय आधारावर जनगणना आदी आश्वासने या जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत.
छत्तीसगडसाठी काँग्रेसने सहा वायदे केले आहेत. त्यामध्ये सर्व सरकारी शिक्षणसंस्थांमध्ये बालवाडी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंतचे शिक्षण विनामूल्य दिले जाईल असे आश्वासन आहे. या धोरणाचा लाभ सर्व समाजांना दिला जाईल, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले. तसेच तेंदूपाने गोळा करणाऱ्यांसाठी प्रती पिशवी चार हजार रुपयाचे किमान आधारभूत मूल्य देणे, वनोत्पादनांसाठी किमान आधारभूत दरात दहा रुपयांची वाढ करणे, या आश्वासनांचाही समावेश आहे. राज्यातील भानुप्रतापपूर येथे जाहीर सभेत या आश्वासनांची घोषणा करण्यात आली. राहुल गांधी यांनी या जाहीर सभेत भाषणही केले.
भाजपला गरीबांचा कळवळा नाही
भाजपचे सरकार केवळ श्रीमंतांचाच लाभ करुन देत आहे. त्याला गरीबाशी काही देणेघेणे नाही. गरीबांच्या मुलांनी इंग्रजी बोलावे असे भाजपला वाटत नाही. अदानींसारख्या उद्योगपतींचा लाभ करुन देणे हेच भाजपचे काम आहे. आमचे सरकार पुन्हा आल्यास शेतकरी, गरीब, मजूर यांच्या लाभासाठी कार्य केले जाईल. मात्र, भाजप सरकार केवळ श्रीमंताचा लाभ करुन देण्यात मग्न आहे, अशी टीका त्यांनी या भाषणात केली. जातीय जनगणना करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. केंद्र सरकारने हेतुपुरस्सर अशी जनगणना टाळली आहे. कारण केंद्र सरकारला गरीब आणि मागासांसंदर्भात आदर नाही, अशी टीका त्यांनी केली.
दोन तासांमध्ये आश्वासने पूर्ण
गेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार राज्यात आले. त्यानंतर दोन तासांमध्ये आम्ही आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण केली. आता पुन्हा निवडून आल्यास नवी आश्वासनेही पहिल्या काही दिवसांमध्येच पूर्ण केली जातील. जनतेचा आमच्यावर विश्वास असून आम्हालाच सत्ता मिळेल असे भाकित त्यांनी केले.









