उघड्यावरच जनावरे बांधण्याची वेळ : शेतकरी, दलाल व व्यापाऱ्यांचे हाल : एपीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष
वार्ताहर /अगसगे
एपीएमसी जनावरांच्या बाजारामध्ये अनेक गैरसोयी असल्याने जनावरांसह व्यापारी, दलाल व शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे एपीएमसी प्रशासन व अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव किल्ल्यानजीक जनावरांचे बाजार भरवले जात होते. त्या ठिकाणी देखील अनेक समस्या होत्या. पावसाळ्यात चिखल होऊन दलदल निर्माण होत होती. त्यानंतर प्रशासनाने एपीएमसीमध्ये जनावरांचे बाजार सुमारे 15-16 वर्षापूर्वी स्थलांतर करण्यात आले. यावेळी शेतकरी, दलाल व व्यापारी यांना एपीएमसीमध्ये सर्व सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. मात्र 15-16 वर्षे झाली तरी या ठिकाणी उघड्यावरच जनावरांचा बाजार भरवला जात आहे. यामुळे येथील समस्या कधी सुटणार, असा प्रश्न पडला आहे. या ठिकाणी बैल, म्हशी, गायी यांचा स्वतंत्र बाजार पाहिजे. पण येथे सर्व जनावरे एकाच ठिकाणी बांधली जातात. त्यांना स्वतंत्र सुसज्ज बाजारपेठ बनवून देण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील गैरसोयी तशाच आहेत. यामुळे याचा त्रास शेतकरी, व्यापारी व दलालांना होत आहे.
चाऱ्याअभावी जनावरे उपाशी
या ठिकाणी जनावरे पावसाळ्यात व उन्हाळ्यामध्ये उघड्यावरच बांधली जातात. त्यांना शेडची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. जनावरे बांधण्याची सोय नसल्यामुळे शेतकरी दगडांना व लोखंडी सळ्या जमिनीमध्ये मारुन जनावरे बांधतात. जनावरांच्या मार्केटमध्ये काँक्रीटीकरण करणे महत्त्वाचे आहे. जनावरांना पिण्याचे पाणी नाही. तसेच दिवसभर उन-पावसामध्ये ताटकळत उभी असतात. जनावरांना या ठिकाणी चारा मिळत नाही. एपीएमसीने जनावरांना चारा मिळवून देण्याकडे लक्ष दिले पाहिजे. चारा नसल्यामुळे दिवसभर जनावरे उपाशी ताटकळ असतात. या ठिकाणी शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व दलालांना चहा, नाश्त्याअभावी टपरीवरील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. एपीएमसीने पाईपलाईन घालून जनावरांना व शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.









