भारतासह युरोप अन् आफ्रिकेतही दर्शन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
25 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी चालू वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण झाले आहे. हे सूर्यग्रहण भारतात सुमारे 2 तास दिसले. देशाच्या बहुतांश भागात ते दिसून आले आहे. अमृतसरमध्ये संध्याकाळी 4.19 वाजता देशात पहिल्यांदा सूर्यग्रहण दिसून आले आहे. तर पूर्वेकडील भागात सूर्यास्त लवकर होत असल्याने हे ग्रहण दिसून आले नसल्याचे समजते. भारतातील विविध भागांमधील नागरिकांमध्ये सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता दिसून आली.
हे सूर्यग्रहण खंडग्रास प्रकारातील होते. अनेक खगोलशास्त्राrय केंद्रांमध्ये हे ग्रहण पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ग्रहण पाहण्यासाठी खगोलशास्त्राrय दुर्बीण, कॅमेरा आणि विशेष आवरण असणाऱया चष्म्यांची व्यवस्था केली गेली होती. सूर्यग्रहणाचा सर्वाधिक कालावधी जम्मू-काश्मीरमध्ये दोन तास 6 मिनिटे इतका राहिला आहे. सूर्यग्रहणाचा कालावधी तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी तर अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये काही मिनिटांपुरतीच राहिला आहे. भारतात अशाप्रकारचे सूर्यग्रहण आता 10 वर्षांनी म्हणजेच 2032 मध्ये होणार आहे.
युरोप, उत्तर-पूर्व आफ्रिका, मध्यपूर्व, पश्चिम आशियामध्ये हे ग्रहण दिसून आले आहे. सूर्यग्रहणानंतर 8 नोव्हेंबर पूर्ण चंद्रग्रहणही होणार आहे. हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर क्षेत्र आणि अमेरिकेत दिसून येणार आहे. भारतातही हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे.









