मुलांची कमतरता अधिक : देशभरातील स्थिती, अनाथाश्रमात अर्ज करूनही प्रतीक्षाच
बेळगाव : एकेकाळी अनाथ मुलांना समाज वाळीत टाकीत होता. आई-वडिलांचे छत्र हरविलेली मुले नेहमीच दुर्लक्षित राहत असत. मात्र आज अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था, दाम्पत्ये पुढे येत आहेत. मात्र दत्तक घेण्यास मुलेच मिळत नसल्याची स्थिती आज देशभरात दिसून येते. कोविड काळामध्ये देशभरात अनेक मुलांचे आई-वडील निवर्तल्याने ही मुले अनाथ झाली. या मुलांना सरकारने आहार, शिक्षण, पाठ्यापुस्तके याशिवाय निवासाची व्यवस्था करून दिली आहे. मात्र ही मुले आई-वडिलांच्या प्रेमापासून पोरखी झाली आहेत. आज देश-विदेशातील काही दाम्पत्य अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी अनाथाश्रमात अर्ज करून मुलांसाठी प्रतीक्षा करीत आहेत. मात्र काहींनाच दत्तक घेण्याची संधी मिळताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, कुपोषण, तणाव यासारख्या समस्यांतून अनेक मुले रोगग्रस्त बनली आहेत. त्यामुळे अशा मुलांना दत्तक घेण्यास कोणीच पुढे होताना दिसत नाही. सहा ते आठ वर्षातील काही मुले अनाथ असली तरी त्यांना आई-वडिलांसारखे प्रेमाचे छत्र मिळणे दुरापास्त झाले आहे.
ऑनलाईनद्वारे अर्ज
दत्तक प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होत असते. दत्तक घेणारे दाम्पत्य ‘केरिंग्ज पोर्टल’वर नाव नोंदणी करणे आवश्यक असते. मुले दत्तक घेण्यास योग्य असल्यास त्या मुलांबद्दल संबंधित अर्जदारांना माहिती दिली जाते. त्यानंतर दाम्पत्य दत्तक स्वीकार केंद्रामध्ये दाखल होतात. येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दत्तक प्रक्रिया पूर्ण होत असते. राज्यात सध्या 21 सरकारी विशेष दत्तक केंद्रे व 24 सरकारी विशेष दत्तक केंद्रे आहेत.
सध्या कर्नाटक चौथ्या स्थानावर
वर्षभरात 200 ते 250 मुले दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असतात. मात्र अर्जदारांची संख्या हजार ते दीड हजारपर्यंत असते. सध्या कर्नाटक चौथ्या स्थानावर आहे. देशभरात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर दिसून येतो. कर्नाटकात 2020 ते 2025 या कालावधीत 1265 जणांनी दत्तक मुले स्वीकारली आहेत. यामध्ये 1132 स्वदेशी तर 133 विदेशी दाम्पत्यांचा समावेश आहे.









