वृत्तसंस्था / लखनौ
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांचे ऐक्याचे प्रयत्न सुरू असतानाच उत्तर प्रदेशात त्यांना मोठाच धक्का बसला आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांच्या अनेक मान्यवर नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शालिनी यादव यांचाही या नेत्यांमध्ये समावेश आहे.
2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक भाजप नेत्यांनी सप किंवा अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यापैकी बरेचसे नेते आता पुन्हा भाजपमध्ये आले आहेत. या सर्व नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून त्यांनी देशाचा झपाट्याने विकास केला आहे अशी प्रशंसा केली आहे. भाजपमध्ये परतणाऱ्यांमध्ये साहब सिंग सैनी हेही आहेत.
नेत्यांचे स्वागत
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या उत्तर प्रदेश शाखेचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हेही उपस्थित होते. भाजपच्या नेत्यांनीं पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत केले. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे राज्यातील सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विरोधीं पक्ष अधिक दुर्बळ होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हात बळकट करण्यासाठीं हे नेते भाजपमध्ये आले आहेत, असे प्रतिपादन भाजप नेत्यांनी केले.
गेल्या आठवड्यातही…
गेल्या आठवड्यातही सपचे विद्यमान आमदार दारासिंग चौहान यांनी आमदारपद सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत घोशी मतदारसंघातून सपच्या तिकिटावर विजय मिळविला होता. तसेच समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असणारा सुहेलदेव बहुजन समाज पक्ष भाजपमध्ये विलीन झाला होता. या पक्षाचा राजभर या अन्य मागासवर्गीय समाजवर चांगला प्रभाव आहे.
कोणाकोणाचा प्रवेश
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक वाराणसीतून लढविलेल्या शालिनी यादव, 2019 मध्ये भाजप सोडून समाजवादी पक्षात गेलेले अन्शुल वर्मा, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे माजी मंत्री आणि प्रभावशाली नेते साहब सिंग सैनी, समाजवादी पक्षाच्या माजी आमदार सुषमा पटेल, समाजवादी पक्षाचे माजी आमदार जगदीश सोनकर आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे माजी आमदार राजपाल सिंग सैनी आदी नेते भाजपमध्ये प्रवेशले आहेत. आणखी काही नेते नंतर प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली.