काँग्रेस पक्षाने अनेक चुका केल्या असून आता पक्षाच्या धोरणात परिवर्तन करण्याची वेळ आली आहे, अशी स्पष्ट कबुली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. भारतातील कमजोर लोकांना साहाय्य करण्यात आपली राज्यघटनाही अपेक्षेपेक्षा कमी पडली आहे, असेही विधान करुन त्यांनी नवा वाद निर्माण केला.
काँग्रेसच्या हातून अनेक चुका झाल्या. चुकीची धोरणे पक्षासाठी लागू करण्यात आली. आगामी काळात या चुका सुधाराव्या लागणार आहेत. तसेच पक्षाला नवी दिशा देण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसला आता नव्या काळाप्रमाणे सुधारावे लागणार आहे. या देशातील अनेक नागरीकांचे भवितव्य त्यांच्या जन्माआधीच ठरविले जाते. इथली व्यवस्थाच तशी आहे. या व्यवस्थेकडूनच लोकांनी कोणते काम करावे आणि कोणते काम करु नये हे ठरविले जाते. लोकांना त्यांचे भवितव्य ठरवू दिले जात नाही. समाज त्यांचे भवितव्य ठरवितो. यामुळे आपल्या देशातील बरीच प्रतिभा वाया गेली आहे, इत्यादी अनेक मुद्दे त्यांनी मांडले. ते शनिवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे विचार व्यक्त करीत होते.
नेमकेपणा नाही
काँग्रेसने नेमक्या कोणत्या चुका केल्या आणि केव्हा केल्या याचे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले नाही. तसेच त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, याचा खुलासाही त्यांनी केला नाही. मात्र, काँग्रेसकडून चुका झाल्या या त्यांच्या विधानाचे आता बरेच वेगवेगळे अर्थही लावण्यात येत असून या विधानाचा संबंध सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीशीही तज्ञांकडून जोडण्यात येत आहे.









