सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील भटवाडी परिसरातील सुमारे २०० कुटुंबे तीन दिवस अंधारात असून अजूनही विजेबाबत कोणतीही ठाम माहिती नसल्याने नागरिक साफ हतबल झाले आहेत.विजेमुळे पाण्याची मोठी समस्या या भागात निर्माण झाली आहे. नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. काहींनी तर इमारतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचा आधार घेतला. एका नागरिकाने तर पावसाचे आभार मानताना पाऊस नसता, तर पाण्याचे मोठे हाल झाले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शुक्रवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. अर्थात हे जर तरवर अवलंबून असून तसे न झाल्यास या नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. याच भटवाडीमध्ये जाणाऱ्या गटाराचे काम सुरू असून तेही वेळत पूर्ण होण्याबाबत प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे.









