सातारा/प्रतिनिधी
कास रोडवरील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडणार या भीतीने धनदांडगे हतबल झाले असून स्थानिक रहिवाशांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आणून बेकायदेशीर बांधकामांचा मुद्यावरून जिल्हा प्रशासनाचे लक्ष विचलीत करीत आहेत. एवढा जर पुळका स्थानिक रहिवाशांचा असेल तर कवडीमोल किंमतीने घेतलेल्या जमीनीच्या जागेवर हाँटेल, रिसाँल्टमध्ये स्थानिकांना कपबशी, भांडी, झाडलोट करायला लावण्यापेक्षा त्यांना धंद्यात भागीदार करून मालक म्हणून जनमानसात प्रतिमा उजाळून ताट मानेने फिरून मानसन्मान मिळवून द्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केले आहे.
कासची बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाई यापूर्वी ज्यापध्दतीने थांबलली तशीच यावेळी “अर्थ”पूर्ण संबंध आणि राजकीय दबावाने थांबवता येईल असा धनदांडग्याचा विचार असावा. बेकायदेशीर बांधकामाची पहाणी जिल्हाधिकाऱ्यांनी करून तहसिलदारांना कारवाईचे आदेश दिल्याने मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.
या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई होऊन पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबला नाही तर आपण निश्चितपणे न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा दिल्याने महसूल विभाग कारवाईच्या मानसिकतेत आहे. या गोष्टी लक्षात आल्याने धनदांडग्यांनी आता स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाच्या गोंडस नावाखाली सहानूभुतीचे गाजर पुढे केले आहे. ही पळवाट आहे. एवढा उदरनिर्वाहाचा पुळका असेल तर ज्यांच्या जमीनी कवडीमोल किंमतीने घेतल्या त्यांना कामगार म्हणून कपब, भांडी धुण्याला राबवून घेण्यापेक्षा मालक म्हणून भागिदारीत घेवून त्यांना मालक म्हणून समाजात वावण्याचा बहूमान मिळवून द्यावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे.
जे मालमत्ता धारक व्यवसायिक सहाभूती मिळवत आहेत त्यांनी गेल्या आठ-दहा वर्षात किती स्थानिकांना रोजगार मिळवून दिला. कर्मचाऱ्यांच्या नोंदी कामगार आयुक्त कार्यालयात आहेत का ? त्यांना इएसआय ही वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली का ? भविष्य निर्वाह निधी किती कर्मचाऱ्यांचा जमा केला ? या सर्व बाबींची शहानिशा व्हायला हवी. या गोष्टी जर व्यावसायिकांनी केल्या नसल्यास त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी अशी मागणी मोरे यांनी केली आहे









