संगरूर मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा रोड शो
वृत्तसंस्था /संगरूर
पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी रोड शो केला आहे. भदौडपासून हा रोड शो सुरू झाला. पंजाबमध्ये भ्रष्टाचारप्रकरणी काही जणांना गजाआड केले असून अनेक जण तुरुंगवारीच्या वाटेवर आहेत. जामीन देखील मिळू शकणार नाही अशाप्रकारे कठोर कारवाई करणार असल्याचे मान यांनी म्हटले आहे.
वन विभागातील वृक्षतोड घोटाळय़ात सामील काँग्रेसचे माजी मंत्री साधू सिंह धर्मसोत यांचा मान यांनी यावेळी उल्लेख केला. दक्षता पथकाने साधू यांना पहाटे अटक करण्यात यावी असे म्हटले होते. परंतु मी रात्रीच उचला असा निर्देश दिला. पहाटेपूर्वी साधू अन्य पक्षात सामील होऊ शकतात असे अधिकाऱयांना सांगितले होते असे उद्गार मान यांनी काढले आहेत. रोड शोवेळी मान यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार गुरमेल सिंह यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
खासदार करा, मग कैदेत असलेल्या शिखांना सोडवू असे अकाली दलाचे नेते सांगू लागले आहेत. खासदार झाल्यावर कैदेतील शिख मुक्त होतील असा नियम कुठे आहे? जर असा नियम असल्यास मग हरसिमरत कौर बादल आणि सुखबीर बादल यांनी कैदेतील शिखांना का सोडविले नाही? ते दोघेही खासदार आहेत. ज्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे, ते तुरुंगातून बाहेर पडावेत अशी माझीही इच्छा असल्याचे मान यांनी म्हटले आहे.
मान यांनी शिरोमणी अकाली दलाचे नेते सिमरनजीत मान यांच्यावर टीका केली आहे. सिमरनजीत मान हे तलवार हातात घेऊन फिरत आहेत. आम्ही प्रेम आणि प्रगतीबद्दल बोलत आहोत. तर ते तलवारीबद्दल बोलत आहेत अशी टीका मान यांनी केली आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजप उमेदवार केवळ ढिल्लोंवर शरसंधान केले आहे. आमचे घरचे स्वयंसेवक गुरमेल यांच्या विरोधात ढिल्लों निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ढिल्लों यांची स्पेनमध्ये 2 घरे आहेत. स्पेनचा अर्थ अमली पदार्थांची तस्करी असा होतो. अशा लोकांची घरे तेथेच असतात. ढिल्लों संगरूरमध्ये विमानतळ निर्माण करू असे सांगत आहेत. हा विमानतळ त्यांच्याच उपयोगी पडणार असल्याची उपरोधिक टीका मान यांनी केली आहे.









