खाण संचालकांकडून लिलाव आयोजन : दि. 15 नोव्हेंबरपर्यंत निविदा खरेदी,दि. 21 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादरीकरणाची मुदत
विशेष प्रतिनिधी /पणजी
गोवा सरकारच्या खाण संचालनालयाने पहिल्या टप्प्यात एकूण 4 खाणींच्या ब्लॉक्सकरीता लिलाव पुकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी लिलावपूर्व चर्चेत सहभागी होण्यासाठी देशातील अनेक नामवंत खाण कंपन्या तसेच गोव्यातीलही खाण उद्योजक सहभागी झाले. 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांना निविदा बोली लावाव्या लागतील, अर्ज सादर करावे लागतील. डिसेंबरमध्ये लिलाव पुकारण्यात येईल.
गोव्याच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील खाण व्यवसाय पूर्ववत सुरु करण्याच्या उद्देशाने गोवा सरकारने खाण खात्यामार्फत एकूण 4 खाण ब्लॉक्स करीता निविदा जारी केल्या. त्यानंतर शुक्रवारी खाण संचालकांनी संबंधित व इच्छूक सर्व खाण कंपन्यांना प्रि बिड कॉन्फरन्स करीता बोलाविले होते. यावेळी राष्ट्रीय पातळीवरील अनेक खाण कंपन्यांनी गोव्यात आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुकता दाखविली. गोव्यातील या अगोदरच्या खाण कंपन्यांनी देखील लिलावात भाग घेण्याचे ठरविले आहे.
शुक्रवारच्या बैठकीत 24 कंपन्या सहभागी
प्राप्त माहितीनुसार, लिलाव पुकारण्याअगोदरच्या काल शुक्रवारी बोलाविण्यात आलेल्या खास बैठकीत जिंदाल, मित्तल अशा नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. एकूण 24 कंपन्यांनी या बैठकीत भाग घेतला. यावेळी खाण संचालक सुरेश शानभोग हे मार्गदर्शन करीत होते.
15 नोव्हेंबरपर्यंत बोलीस भाग घेण्यास मुदत
खाणींसाठी लिलाव पुकारला जाईल. त्यासाठी कोणकोणत्या अटी व नियम असतील याबाबतची माहिती सर्व खाण कंपन्यांच्या प्रतिनिधिना देण्यात आली. आता दि. 15 नोव्हेंबरपर्यंत संबंधित कंपन्यांना बोलीत भाग घेण्यासाठी निविदा पत्रिका खरेदी कराव्या लागतील आणि त्या भरुन खाण संचालनालयात सादर कराव्या लागतील.
21 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत
डॉ. सुरेश शानभाग यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये निविदा खोलल्या जातील व लिलाव पुकारला जाईल. एमएसटीसीई या केंद्र सरकारच्या कंपनीतर्फे लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 15 नोव्हेंबर ही निविदा कागदपत्रे खरेदी करण्याची शेवटची तारीख आहे. दि. 21 नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे त्यांना सादर करावी लागतील. त्यानंतर डिसेंबरमध्ये लिलाव पुकारला जाईल.
डिसेंबरमध्ये आणखी 6 ब्लॉक्ससाठी निविदा
लिलाव पुकारल्यानंतर ज्यांनी बोली लावली त्यांना तीन वर्षांच्या आत सारे परवाने प्राप्त करुन त्वरित खाणी सुरु कराव्या लागतील. या खाणींना पर्यावरण परवाने मिळविण्याची जबाबदारी गोवा सरकारने खाण चालकांवर सोपविलेली आहे. डिचोली, शिरगाव, मये शिरगाव आणि सांगे तालुक्यातील काले इत्यादी भागात मिळून 140 दशलक्ष टन खनिजमाल मिळणार. त्यासाठीच हा लिलाव पुकारला जाणार आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये आणखी 6 ब्लॉक्स करीता नव्याने निविदा पुकारल्या जाणार आहेत.