पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या वर्षभरात मोठमोठे स्फोट होणार असून, विरोधी पक्षातील अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. आमचा ‘महाविजय 2024’ संकल्प निश्चित झाला असून, भाजपा व शिंदे गट राज्यातील 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पुण्यात आयोजिलेल्या भाजपाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, 2019 मध्ये शिवसेना व भाजपा युतीने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित निवडणुका लढविल्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी बेईमानी केली. मुख्यमंत्री असताना ठाकरे दोनदाच मंत्रालयात गेले, असे स्वत: शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे. ते स्वपक्षातील अनेक नेत्यांनाही भेटत नव्हते. त्यांना माणसे सांभाळता आली नाहीत. 75 टक्के आमदार नाराज असल्यानेच सेनेत अभूतपूर्व फूट पडली. आता महाविकास आघाडीकडून आव्हानाची भाषा केली जात असली, तरी पुढच्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय स्फोट होणार आहेत. विरोधकांमधील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असून, निवडणुकीआधी ते भाजपात प्रवेश करतील. राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे यांच्या पक्षप्रवेशानंतर असे अनेक पक्षप्रवेश होणार आहेत.
‘महाविजय 2024’चा संकल्प भाजपा व शिंदे गटाने केला असून, लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48 जागांवर आम्ही विजय होऊ. बूथच्या माध्यमातून भाजपाचे 35 लाख कार्यकर्ते कार्यरत राहणार असून, पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहे. तसेच विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार उतरवून 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपा-सेना युतीचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर 30 ते 1 जूनदरम्यान ‘घर घर चलो अभियान’ राबविण्यात येणार आहेत. 9 वर्षांच्या मोदी यांच्या कारभाराचा लेखाजोखा याद्वारे मांडणार आहे. तसेच 176 वर योजनांची माहिती लोकांना करून दिली जाणार आहे.
पक्षात 30 तारखेपर्यंत मोठे फेरबदल
याशिवाय 30 तारखेपर्यंत पक्षपातळीवर मोठे बदल केले जाणार आहेत. सर्व ठिकाणी विधानसभा निवडणूक प्रमुख नेमले जातील. जिल्हाध्यक्षपदाची पुनर्रचना केली जाईल. दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष यापुढे नेमण्यात येतील, असे सांगतानाच महापालिका निवडणुकीची आमची तयारी पाहूनच संजय राऊत यांना मिरची झोंबली असावी. त्यामुळे पक्षाध्यक्षांवर टीका करीत आहेत. मात्र, घोडे मैदान जवळ आहे. त्यात नड्डाजी काय आहेत, हे राऊत यांना कळेलच, असे प्रत्त्युत्तर त्यांनी दिले.







