वृत्तसंस्था/ भोपाळ
येथे सुरु असणाऱ्या ऑलिम्पिक निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक महिला नेमबाज मनू भाकरने 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात आपले वर्चस्व कायम राखले आहे. या क्रीडा प्रकारात मनू भाकरला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती ईशा सिंगकडून कडवे आव्हान मिळाले.
महिला नेमबाज मनू भाकरला भारताच्या आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नेमबाज जस्पाल राणाचे मार्गदर्शन लाभत आहे. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारातील तिसऱ्या चाचणीमध्ये मनू भाकरने 241.0 गुणासह पहिले स्थान मिळविले. ईशा सिंग 240.2 गुणासह दुसरे तर रिदम सांगवानने 220.3 गुणासह तिसरे स्थान घेतले. महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारातील तिसऱ्या चाचणीमध्ये रमिता जिंदालने 252.6 गुणासह पहिले स्थान तर इलाव्हिनेल व्हॅलेरवेनने 252.1 गुणासह दुसरे स्थान आणि नॅन्सीने तिसरे स्थान पटकाविले.









