शिरोली-हेम्माडगा भागातील ग्रामस्थांना-प्रवाशांना नाहक त्रास : आमदार विठ्ठल हलगेकर, खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी लक्ष देण्याची मागणी
खानापूर : मणतुर्गा रेल्वे भुयारी मार्गाच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यापासून खानापूर-अनमोड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. मात्र कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे अजून किमान महिनाभर तरी रस्त्याचे काम होणार नसल्याने या भागातील नागरिक आणि प्रवाशांतून तीव्र संतात व्यक्त होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर आणि खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी याबाबत लक्ष घालून कंत्राटदाराला काम तातडीने पूर्ण करण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
खानापूर-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गाजवळील फाटक बंद करण्यात आले असून या ठिकाणी भुयारी मार्ग निर्माण करण्यात आला आहे. या भुयारी मार्गाच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी खानापूर-अनमोड हा रस्ता वाहतुकीसाठी गेल्या दोन महिन्यापासून बंद करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, अशी सूचना आणि जाहीर निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यापासून हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जाहीर निवेदनात दि. 22 मार्च नंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र कंत्राटदाराने या मुदतीत काम पूर्ण केलेले नाही. अद्याप अजून बरेच काम शिल्लक असून कंत्राटदाराने अतिशय संथगतीने काम केल्याने हे काम जाहीर केलेल्या वेळेत झालेले नसल्याने नागरिकांना पुढील महिनाभर त्रास सहन करावा लागणार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्यामुळे नागरिकांना मणतुर्गा गावातून अशोका मार्गे खानापूर गाठावे लागत आहे. मणतुर्गा गावातून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यान ग्रामस्थांना गावाबाहेरून रस्ता काढून दिलेला आहे. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती असल्याने यातून प्रवास करताना धुळीच्या सामना करावा लागत आहे. तसेच रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात वाहतूक असल्याने वेळोवेळी चक्काजाम आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. तसेच खानापूरजवळील रेल्वे फाटक सातत्याने बंद रहात असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. त्यातच दहावी व बारावीच्या परीक्षाच्या सुरू आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यासाठी वेळेत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कंत्राटदाराच्या बेफिकिरपणा आणि वेळकाढूपणामुळे वेळेत काम पूर्ण झालेले नाही.
याबाबत कंत्राटदारांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या भागातील ऊस वाहतुकीसाठी आमदार विठ्ठल हलगेकर आणि तत्कालीन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी काम उशिरा सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही वीस दिवस काम उशिरा सुरू केलेले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी महिनाभर वाढीव वेळ देण्याचे सांगितले होते. त्यानुसार येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी आम्हाला वाढीव वेळ मिळणार असल्याचे सांगितले. अद्याप महिनाभर रस्त्याच्या कामासाठी कालावधी लागणार असल्याचेही कंत्राटदारांनी सांगितले.
याबाबत या भागातील नागरिकांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची गरजच नव्हती. कारण गेल्या वर्षभरापासून भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते. या पर्यायी रस्त्याचा आणि भुयारी मार्गातील काँक्रीटीकरणाचा काहीही संबंध नसताना कंत्राटदाराच्या हेकेखोरपणामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून संपूर्ण चाळीस गावातील नागरिकांना तसेच बेळगाव, गोवा वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले असल्याचे या भागातील नागरिकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. आताही पर्यायी रस्ता असल्याने हा संपूर्ण रस्ताच वाहतुकीसाठी बंद करणे चुकीचे असल्याचेही सांगितले.









