भुयारी मार्ग यशस्वी होईल की नाही शंका : भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल उभारण्याची मागणी
खानापूर : मणतुर्गा रेल्वे भुयारी मार्गाच्या कामासाठी गेल्या चार महिन्यापासून खानापूर-अनमोड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली होती. बुधवारी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे हेम्माडगा, शिरोली परिसरातील ग्रामीण भागातील जनतेची सोय झाली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असले तरी हा भुयारी मार्ग यशस्वी होईल का, हे येणाऱ्या पावसाळ्यातच स्पष्ट होणार आहे. अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील मणतुर्गा येथे रेल्वे फाटक बंद करून या ठिकाणी भुयारी मार्ग निर्माण करण्यात आला आहे. भुयारी मार्गाच्या आतील रस्त्याच्या कामासाठी आणि मुख्य रस्त्याला भुयारी मार्ग जोडण्यासाठी गेल्या पाच महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करून ही वाहतूक असोगामार्गे वळविण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या दोन महिन्यासाठी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे जवळपास पाच महिने काम उशीरा पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या त्रासापासून सुटका झाली आहे.
पावसाळ्यात भुयारी मार्ग पाण्याखाली जाण्याचा धोका
खानापूर-अनमोड रस्त्यावर मणतुर्गा रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या भुयारी मार्गाच्या जवळूनच हलात्री नदी वाहते. पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे दहा-दहा दिवस बंद होते. भुयारी मार्ग नदीला लागूनच असल्याने तसेच पावसाळ्यात पाण्याची फूग रेल्वेफाटकापर्यंत येत असल्याने हे पाणी भुयारी मार्गात जाण्याचा धोका स्पष्ट होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भुयारी मार्गावर पाणी साचल्याने येथून वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग अयशस्वी होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे. भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल उभारणे गरजेचे होते. मात्र उड्डाणपूल उभा केल्यास प्रवाशांची योग्य सोय झाली असती, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या पावसातच या भुयारी मार्गाचे भवितव्य स्पष्ट हेईल.









