पुणे / प्रतिनिधी :
मागच्या काही दिवसांपासून कोकणात खोळंबून राहिलेले नैऋत्य मोसमी वारे आता पुढे सरकणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून पुण्या-मुंबईत धडकेल. त्यानंतर तो सबंध राज्यात जोर धरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, मान्सूनची पूर्व शाखा सक्रिय असून, गुरुवारी तिने तेलंगणा, संपूर्ण आंध्र प्रदेश, ओरिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारचा काही भाग व्यापला.
यंदाच्या वर्षी मोसमी वाऱ्यांचा प्रवास अडखळताच राहिला आहे. अंदमानात 22 मेच्या आसपास दाखल झालेला मान्सून केरळात 4 जूनपर्यंत दाखल होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात केरळात चार दिवस उशिरा म्हणजेच 8 जून रोजी त्याचे आगमन झाले. दरवर्षी 1 जूनला केरळात मान्सून सक्रिय होत असतो. या वर्षी आठवडाभर उशिराने देवभूमीत त्याचे दर्शन घडले. त्यानंतर ऐन मृग नक्षत्राच्या प्रारंभी म्हणजेच 7 जूनला कोकणाला मान्सूनने हुलकावणी दिली. त्यानंतर कोकणात मोसमी वारे दाखल झाले असली, तरी त्यांचा प्रभाव तितकासा दिसून आलेला नाही. बिपरजॉय चक्रीवादळानेही मान्सूनच्या मार्गात अडथळे निर्माण केल्याने अर्धा जून उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्रात मोसमी पाऊस होऊ शकलेला नाही.
सध्या मान्सून रत्नागिरीपर्यंत आलेला अद्यापपर्यंत तेथेच अडकून पडला आहे. त्यामुळे तो कधी पुढे सरकणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे लागले आहे. पावसाअभावी अनेक भागांतील पेरण्या रखडल्या आहेत. ऐन पेरण्यांचा हंगाम वाया गेला, तर यंदाच्या वर्षी शेतीचे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. दुसरीकडे धरणे व जलाशयांनीही तळ गाठल्याचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये काही दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याचे दिसत आहे. पुण्यासारख्या शहरातही जुलैपर्यंत पुरेल इतकाच साठा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाऊस कधी येणार, हाच सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे. अशा वेळी मान्सून पुढे सरकणार असल्याचा अंदाज आल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. पश्चिमी वाऱ्यांनाही लवकरच बळ मिळणार असून, मान्सून पुणे आणि मुंबईत लवकरच धडक मारेल. त्यानंतर मान्सून राज्यात जोर धरेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सूनसाठी पोषक स्थिती; मध्यप्रदेशपर्यंत धडक मारणार
मान्सूनची पूर्व शाखा अधिक सक्रिय असून, तिची घोडदौड सुरुच आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून ओरसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशपर्यंत धडक मारेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उष्णतेची लाट ओसरणार
तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड, बिहार, विदर्भात पसरलेली उष्णतेची लाट ओसरणार आहे. या भागातील कमाल तापमानात घट होणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात होणार वादळी पाऊस
राज्याच्या काही भागांत यंदा वळवाचा पाऊस झाला. मात्र, ऐन जूनमध्ये मात्र पावसाने पाठ फिरविली. तथापि, महाराष्ट्रात शुक्रवारपासून वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यात कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवस, तर त्यानंतरही मराठवाडा वगळता सर्वत्र पाऊस राहणार आहे.








