वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या अॅपोलो टायर्स पुरस्कृत नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये पुरुष विभागात उत्तराखंडच्या मानसिंगने तर महिला विभागात उत्तराखंडच्या भागिरथीने विजेतेपद पटकाविले.
2024 च्या आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमधील विजेता 35 वर्षीय मानसिंगने पुरुषांच्या इलाईट विभागात 2 तास, 15 मिनिटे आणि 24 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद मिळविले. प्रदीप चौधरीने 2 तास, 15 मिनिटे आणि 29 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर अक्षय सैनीने 2 तास, 15 मिनिटे आणि 34 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले.
महिलांच्या विभागात उत्तराखंडच्या भागिरथी बिस्तने 2 तास, 48 मिनिटे, 59 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद मिळविले. ठाकूर भारतजीने 2 तास, 49 मिनिटे आणि 16 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर अश्विनी जाधवने 2 तास, 50 मिनिटे, 48 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. महिला इलाईट विभागासाठी 42.195 कि.मी. चे अंतर ठेवण्यात आले होते. दिल्ली मॅरेथॉनमध्ये हाफ मॅरेथॉन ही वेगळी शैर्यत आयोजित केली होती. पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये हरमनज्योत सिंगने पहिले स्थान, शुभम बालियानने दुसरे तर अभिषेकने तिसरे स्थान घेतले. महिलांच्या विभागात टी. मेकॉनेनने पहिले, एस. डोलकरने दुसरे तर स्टानझिन चंडलने तिसरे स्थान पटकाविले. दिल्ली मॅरेथॉनमध्ये सुमारे 25 हजार स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता.









