कोडीहळ्ळी मठाधीशांचे उद्गार, नैसर्गिक आपत्तींचेही भाकीत
बेळगाव : श्रावण महिन्याच्या मध्यामध्ये जगात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाची भीती निर्माण होणार आहे. भूकंप, त्सुनामी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे प्राणहानी होणार आहे, असे भविष्य कोडीहळ्ळी मठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी वर्तविले आहे. गोकाक तालुक्यातील ममदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी कोडीहळ्ळी मठाधीश रविवारी बेळगावला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वामीजींनी राजकारण, नैसर्गिक आपत्ती आदींविषयी भविष्य कथन केले आहे. भविष्य कथनासाठी कोडीहळ्ळी मठाधीश प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचा त्यांच्याकडे राबता असतो. स्वामीजी पुढे म्हणाले, विषारी वायूचा धोका आहे. तो सर्वत्र पसरण्याची भीती आहे. मोठ्या पावसामुळे जगाच्या नकाशावरून दोन देश नष्ट होणार आहेत. भारतातही जलप्रलयाची लक्षणे आहेत. भूकंपामुळे मोठमोठ्या शहरांना धोका निर्माण होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडून प्राणहानी होणार आहे. विषारी वायुचा परिणाम भारतावरही जाणवणार आहे. जगातील काही सम्राटांना धक्का बसण्याचे प्रसंगही घडणार आहेत.
भारताचे चांद्रयान-3 यशस्वी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत काय होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. त्यामुळे याविषयी सध्या सांगणार नाही. माणसावर दैवीकृपा असणे गरजेचे आहे. ज्यांचा दैवीकृपेवर विश्वास आहे, त्यांना त्रास होणार नाही. नाही तर अडचणी अटळ आहेत. दैवीकृपा असूनही काही जणांना त्रास होतो. तो प्रकृतीचा नियम आहे, असेही स्वामीजींनी सांगितले. माणूस निसर्गाच्या विनाशाला कारणीभूत ठरतो आहे. आपल्या आहारपद्धतीतही बदल झाला आहे. केमिकल मिश्रित अन्नसेवन वाढले आहे. नैसर्गिक खताऐवजी रासायनिक खत व केमिकलचा वापर पिकांसाठी वाढला आहे. फळेही सुरक्षित नाहीत. विषाची पेरणी करून, विषाचे पीक घेऊन विष सेवन केले जात आहे. असे असताना आरोग्य चांगले कसे राहील? निसर्गही आपल्यावर खप्पामर्जी हे साहजिक आहे. निसर्गाचा शाप मानवजातीला भोवणार आहे. पूर्वी भूजल पातळी अधिक होती. आता खोलवर कूपनलिका खोदूनही जास्त पाणी मिळत नाही. माणूस झटपट श्रीमंतीच्या नादाला लागला आहे. त्यामुळेच आपत्ती वाढल्या आहेत. याच्या नियंत्रणासाठीच भगवंताचे अस्तित्व आहे. माणसाला त्याचा विसर पडला आहे, असेही स्वामीजींनी सांगितले.









