काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा झटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब काँग्रेसचे मातब्बर नेते आणि नवज्योत सिंह सिद्धू यांचे निकटवर्तीय मनप्रीत बादल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी स्वतःचा राजीनामा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविला आहे. तसेच बादल यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असताना बादल हे अर्थमंत्री राहिले होते. तसेच शिरोमणी अकाली दलाच्या सरकारमध्येही त्यांनी अर्थमंत्री पद भूषविले होते.
भारत जोडो यात्रेदरम्यान मनप्रीत बादल यांच्या या निर्णयामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पक्षाची साथ सोडली होती. तर दिग्गज नेते सुनील जाखड यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मंगळवारीच पंजाबमधून हिमाचल प्रदेशात पोहोचली आहे.
मनप्रीत बादल हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे पुतणे आहेत. 1995-2012 पर्यंत ते विधानसभा सदस्य होते. 2007-10 पर्यंत प्रकाश सिंह बादल आणि काँग्रेस सरकारच्या काळात अर्थमंत्रिपद भूषविले आहे.
1995 मध्ये अकाली दलाच्या तिकीटावर त्यांनी गिद्दडबाहा मतदारसंघात विजय मिळविला होता. 1997, 2002 आणि 2007 मध्ये ते या मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले होते. 2007 मध्ये प्रकाश सिंह बादल सरकारमध्ये अर्थमंत्री असताना केंद्रासोबत मतभेद झाल्यावर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर 2010 मध्ये शिरोमणी अकाली दलाने त्यांना बडतर्फ केले होते.
2011 मध्ये त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ पंजाब नावाचा पक्ष स्थापन केला होता. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने माकप, भाकप आणि शिरोमणी अकाली दलासाब्sात (लोंगोवाल) आघाडी केली होती, दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱया मनप्रीत यांना दोन्ही ठिकाणी पराभूत व्हावे लागले होते. 15 जानेवारी 2016 रोजी त्यांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने भटिंडा शहरी मतदारसंघात त्यांनी विजय मिळविला होता. 2022 च्या निवडणुकीत बादल यांना आप उमेदवाराकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता.









