झी5 वर प्रदर्शित होणार चित्रपट
मनोज वाजपेयी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने स्वतःच्या अभिनयाच्या बळावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. मनोज वाजपेयीच्या पुढील चित्रपटाची घोषणा झी5 कडून करण्यात आली आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सत्य घटनांवर आधारित ‘बंदा’ हा चित्रपट अपूर्व सिंह कार्की यांच्याकडून दिग्दर्शित केला जाणार आहे. तर या चित्रपटाची कहाणी दीपक किंगरानी यांनी लिहिली आहे. पॉवर-पॅक कोर्ट रुम ड्रामा दर्शविणारा हा चित्रपट असणार आहे. झी5 सोबत मनोज वाजपेयीचा हा तिसरा ओटीटी चित्रपट आहे.
‘बंदा’ या चित्रपटात मनोज वाजपेयी एका प्रसिद्ध वकिलाची भूमिका साकारणार आहे. सत्य आणि न्यायासाठी सर्व अडथळे पार करणाऱया वकिलाची ही भूमिका असेल. झी5 सोबतच्या स्वतःच्या तिसऱया चित्रपटाची घोषणा करताना मला मोठा आनंद होतोय. आम्ही एक आकर्षक कहाणी घेऊन येत आहोत असे मनोज वाजपेयीने म्हटले आहे.
‘बंदा’ चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱया सर्व गोष्टी आहेत. यात मनोज वाजपेयी सारखा दमदार अभिनेता आहे. हा चित्रपट प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा म्हणून झी5 हे उत्तम प्लॅटफॉर्म ठरणार असल्याचे दिग्दर्शक अपूर्व सिंह कार्की यांनी म्हटले आहे.









