नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या भूसेना प्रमुखपदी (चीफ ऑफ द आर्मी स्टाफ) लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. विद्यामान प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांचे स्थान लेफ्टनंट जनरल मनोज पांडे स्वीकारणार आहेत. अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) पार्श्वभूमी असणारे ते भारताचे प्रथम भूसेना प्रमुख असतील.
सध्या मनोज पांडे हे भूसेनेचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते पूर्व आघाडीचे प्रमुख होते. त्यांच्यावर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व होते. अत्यंत कौशल्याने त्यांनी ही संवेदनशील सीमा सांभाळली होती.
अल्प परिचय
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी इंजिनिअरींग पदवी घेतली आहे. त्यांनी आपल्या सेना कार्यकाळाचा प्रारंभ 1982 मध्ये ‘बॉम्बे सॅपर्स’ मधून केला. आपल्या 40 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारतीय सेनेत अनेक उच्च पदे भूषविली. त्यांनी आतापर्यंत पारंपरीक आणि फुटीरताविरोधी अशा दोन्ही दलांमध्ये अजोड कामगिरी केली आहे. जम्मू-काश्मीरात ‘ऑपरेशन पराक्रम’ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर इंजिनिअरींग तुकडीचे नेतृत्व पेले होते. तसेच पश्चिम कमांडमध्येही इंजिनिअरींग ब्रिगेडचे नेतृत्व त्यांनी केले. भारतीय सेनेच्या डोंगरी तुकडीचे नेतृत्वही काही काळ त्यांच्याकडे होते. त्यांनी आतापर्यंत अनेक सेना पुरस्कार प्राप्त केले असून त्यात परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन आणि जीओसी-इन -सी कमेंडेशन आदीं पुरस्कारांचा समावेश आहे. 1 फेबुवारी 2022 या दिवशी त्यांची भूसेना उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीमधून प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांनी सेना कार्यकाळाला प्रारंभ केला होता.









