जालना येथील आंतरवली गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. राज्यभरात या लाठीहल्ल्याचे पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आंदोलन कर्त्यांची भेट घेतली.
दरम्यान, राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज (५ सप्टेंबर)ला दुपारी अंतरवाली सराटी या गावात जाऊन मनोज जरांगे- पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारला चार दिवसाचा अल्टीमेटम देत इशारा दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे- पाटील म्हणाले, “गिरीश महाजन यांनी मला मी चार दिवसांत बोलतो असे सांगितले आहे. मीसुद्धा त्यांना तुमच्याकडे चार दिवसांचा वेळ असून त्यानंतर अन्न, पाणी, सलाईन सगळं बंद होणार. आतापर्यंत आम्ही सरकारचा आदर केला. पण आता सरकारने चार दिवसांमध्ये जीआर काढावा असे स्पष्टच सांगितले आहे.” असे ते म्हणाले.








