उपासनेसाठी सर्वश्रेष्ट कालावधी म्हणजे चातुर्मास : उद्या रविवारपासून 4 नोव्हेंबरपर्यंत चालणार
प्रतिनिधी /पणजी
आषाढ शुद्ध (देवशयनी) एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात. या दिवशी देव झोपी जातात, ते कार्तिक शुद्ध एकादशीस जागे होतात. त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. भगवान श्रीविष्णूच्या उपासनेसाठी चातुर्मासाचा कालावधी सर्वश्रे÷ मानला जातो. मनोहारी, सुखासीन, समृद्ध आणि धार्मिक कार्यांची रेलचेल असलेला असा चार महिन्यांचा हा काळ!
आषाढी देवशयनी एकादशी ते कार्तिकी प्रबोधिनी एकादशी हा काळ असून या काळात विष्णू (विठ्ठल) निद्राधीन असतात. हा काळ पावसाळय़ाचा, म्हणजेच चैतन्य, आनंद, उत्साह आणि हिरवा शालू नेसलेल्या वसुंधरेच्या प्रेमात पडण्याचा. हा ऋतूच असा आहे की तो जितका हवाहवासा वाटतो तितकाच नकोसाही. यंदाचा चातुर्मास 10 जुलैपासून सुरू होत असून 4 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू पूर्ण 4 महिने योगनिद्रा अवस्थेत अर्थात झोपी जातात. या चार महिन्यांना चातुर्मास किंवा चौमास म्हणून ओळखले जाते.
व्रतवैकल्यांचे चातुर्मास
चतुर्मास म्हणजे चार महिने. या कालावधीत अनेकविध सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. मराठी संस्कृतीमधील श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने या चातुर्मास कालावधीत येतात. चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून, त्याचा संबंध जीवनशैलीशी संबंधित आहे. ऋतुचक्राशी निगडीत असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्वकितेशी जोडलेले आहेत.
चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व अबाधित
आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. हिंदू धर्मात चातुर्मासाचे खूप महत्त्व आहे. चातुर्मासात मांगलिक कार्य करणे अशुभ मानले जाते. पण ते साधना आणि ध्यानासाठी महत्त्वाचे मानले जाते. चातुर्मासात व्यक्तीला अनेक नियम पाळावे लागतात, जे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहेत. चातुर्मास कालावधीत ठिकठिकाणी धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. काळानुरूप चातुर्मास पाळण्याचे संदर्भ बदलले असले तरी आजही प्रत्येक श्रद्धावान माणूस जमेल तसे चातुर्मासाचे पालन करतो. त्यामुळे बदलत्या काळातही चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व अबाधित आहे.
व्रतवैकल्ये, देवकार्यांसाठी
आषाढ महिन्यातील पडणाऱया पावसाचे रौद्र रूप धडकी भरविणारे असते. पुढे श्रावणात पावसाचा जोर कमी होऊन ऊन-पावसाचा खेळ रंगतो. या श्रावण महिन्यापासूनच पुढे भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक महिन्यापर्यंत आपल्या संस्कृतीत सण, उत्सव यांची रेलचेल असते. एकंदरीत श्रावण ते कार्तिक हे चार महिने आपल्याकडे एक उत्सव असतो आणि हाच उत्सव आपण ‘चातुर्मास’ म्हणून साजरा करतो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनु÷ान, पारायण आदींसाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र आणि महत्त्वाचा समजला जातो.
चातुर्मासातील श्रावण महिन्यातच सर्वात जास्त व्रते आहेत श्रावण महिना म्हणजे पावसाचा मध्य. या काळात आपल्या पोटातील अग्नी मंद झालेला असल्याने व्रत-वैकल्य, उपास याच्या माध्यमातून आपले आरोग्य सांभाळणे हा या चातुर्मासाचा मुख्य उद्देश आहे. शरीराचा महत्त्वाचा भाग आपले पोट. ‘पोट ठीक तर सर्व ठीक’ असे म्हणतात. त्यामुळे या दिवसात कमीतकमी आणि पचायला हलके खाणे उत्तम मानले जाते. भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवानंतर ‘महालय’ पक्ष येतो. त्याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असेही म्हणतात पुढे अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव येतो. वासंतिक आणि शारदीय अशी दोन नवरात्रे आपण साजरी करतो. नवरात्रोत्सव संपला की विजयादशमी अर्थात दसरा सण येतो. चातुर्मासातील अश्विन/कार्तिक महिन्यात येणारा दिवाळी सण समृद्धीचे प्रतीक आणि आनंदाचा उत्सव आहे. कार्तिक महिन्यात येणाऱया कार्तिकी एकादशीनंतर चातुर्मासाची सांगता होते.
नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता विष्णू निष्क्रिय असतो. म्हणूनच चातुर्मासास विष्णूशयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.









