प्रतिनिधी /पणजी
श्री दाडेश्वर कला केंद्र नादोडा, श्री दाड देवस्थान समिती आणि कला आणि संस्कृती संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. मनोहरबुवा कळंगूटकर ऊर्फ जुवेकर मास्तर यांच्या स्मरणार्थ रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी ‘मनोहारी भक्ती महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी 10 वा. श्री व सौ प्रल्हाद गावस यांच्या यजमानपदाखाली श्री सत्यनारायण महापूजा होईल. त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद व महानैवेद्य होईल. सायं. 4 वा. मनोहारी भक्ती महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार असून या सोहळय़ासाठी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ संगीत व भजनी कलाकार गुरूवर्य पांडुरंग राऊळ, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व समाजसेवक नारायण मांद्रेकर, सन्माननीय अतिथी श्री दाड देवस्थानचे अध्यक्ष विशांत गावस, ज्येष्ठ भजनी कलाकार दत्ताराम सावंत, पांडुरंग गावस, श्री दाडेश्वर कला केंद्राचे अध्यक्ष प्रमोद गावस उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळय़ात भजनी कलाकार साजो गावस, तबला वादक विष्णू कळंगूटकर, भजनी कलाकार शांबा शेटय़े, हार्मोनियम वादक अशोक आगरवाडेकर, भजनी कलाकार मसे गावस यांचा सत्कार होणार आहे. सायं. 5 वा. श्री दाडेश्वर कला केंद्र नादोडा यांचे भजन सादरीकरण होईल व त्यानंतर श्री राम सेवा संघ मयडे, श्री शिवप्रसाद सातेरी महिला भजनी मंडळ तुये, श्री महादेव भूमिका करवेश्वर महिला भजनी मंडळ साळ, श्रीराम महिला भजनी मंडळ मांद्रे या निमंत्रित भजनी कला पथकांचे भजन सादरीकरण होईल. रात्री 8 वा. गोमंतकातील ज्येष्ठ भजनी कलाकारांचे भजन सादरीकरण कार्यक्रम होईल व महोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमात पांडुरंग राऊळ, गणेश पार्सेकर, प्रल्हाद गावस हे कलाकार भजन सादर करतील तर त्यांना हार्मोनियमवर विलास शेटय़े, तबल्यावर निशिकांत कळंगूटकर, पखवाजवर प्रसाद कळंगूटकर साथसंगत करतील. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.









