पर्रीकर आधुनिक गोव्याचे खरे शिल्पकार : मुख्यमंत्री डॉ. सावंत
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी मिरामार – पणजी येथील त्यांच्या समाधी स्थळावर पाळण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रीकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले आणि श्रद्धांजली वाहिली. पर्रीकर हे सुधारित व आधुनिक गोव्याचे खरे शिल्पकार होते. मोपा विमानतळ, अटल सेतू, झुवारी पूल, काणकोण बायपास व इतर अनेक प्रकल्प त्यांनी चालीस लावले. अनेक पुलांची बांधकामे केली आणि मोठे परिवर्तन घडवले. अशा शब्दात डॉ. सावंत यांनी पर्रीकरांचे गुणगान केले. पर्रीकर यांनी अनेक मोठे प्रकल्प साकारले त्यामुळे गोव्याचा चेहरा – मोहरा बदलला, असे मत डॉ. सावंत यांनी तेथे बोलताना प्रकट केले. त्यावेळी पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, उत्पल पर्रीकर हे उपस्थित होते. अनेक मंत्री, आमदार तसे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी मंत्री, माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, हितचिंतक अशा सर्वांनी पर्रीकर यांना समाधी स्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. ही त्यांची चौथी पुण्यतिथी होती. विविध कल्याणकारी योजनांच्या ऊपाने पर्रीकर हे जनतेच्या मनात कायम राहतील, असे निवेदन डॉ. सावंत यांनी केले. गोवा राज्य पायाभूत साधन-सुविधा विकाम महामंडळाचे ते पहिले अध्यक्ष होते. त्या महामंडळामार्फत त्यांनी शहरात, गावागावात अनेक प्रकल्प मार्गी लावले, असे डॉ. सावंत यांनी सांगून पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.









