य् ाgवकांचा स्वयंस्फूर्तीने प्रचार : चौगुले यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार
वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना मण्णूर ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून, सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी चौगुले यांनाच प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी गावातील युवक व महिला वर्गाने स्वयंस्फूर्तीने प्रचारपदयात्रा काढून चौगुले यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ हा म. ए. समितीचा बालेकिल्ला मानला जातो. आजतागायत या मतदारसंघात म. ए. समितीच्या उमेदवारांनी बहुमताने विजय मिळविला आहे. पण, मागीलवेळी काही कारणाने झालेल्या समितीमधील बेकीचा फायदा उठवत राष्ट्रीय पक्षांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघ काबीज केला. तेव्हापासून कर्नाटक सरकारकडून बेळगावसह ग्रामीण भागात देखील कानडीकरणाचा वरवंटा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांना संपुष्टात आणण्यासाठी सर्व तऱ्हेने दडपशाहीचा अवलंब करत आहे. मराठी शाळांमध्ये कानडीकरण, मराठी फलक हटविणे, भगव्या ध्वजाला विरोध करणे, बसेसवरील मराठी फलक काढून कन्नड लावणे, सर्व कागदपत्रे फक्त कन्नड भाषेतच देणे अशाप्रकारचा आदेश अधिकाऱ्यांना देऊन सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. सीमाभागात मराठी भाषेतून शिक्षण झाल्याने बहुतांश नागरिकांना कन्नड भाषा अवगत नाही. याबाबत सर्वकाही माहिती असून देखील कर्नाटकी सरकार मात्र दडपशाही मार्गाने मराठीसाठी लढणारी समिती आणि मराठी भाषेला समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. मराठीसाठी लढणाऱ्या अनेक युवकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य अंधकारमय करण्यात आले आहे. सीमाप्रश्नाचा निकाल अद्याप प्रलंबित असून देखील न्यायालय व संविधानाचा अवमान करत कर्नाटकी अन्याय सुरूच आहेत. यासाठी युवकांनी ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन सीमावासियांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी समितीचा उमेदवार निवडून येणे का गरजेचे आहे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून आर. एम. चौगुले यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.
सद्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म. ए. समितीमध्ये एकीची नांदी झाली आहे. सर्व नेतेमंडळी एकजुटीने प्रचारकार्यात सहभाग घेऊन म. ए. समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. सीमाभागातील एकही लोकप्रतिनिधी विधानसभेत नसल्याने कर्नाटकी सरकारचे अन्याय दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत समितीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे. या भावनेतून युवावर्गासह महिला व आबालवृद्ध एकनिष्ठेने समिती उमेदवाराचा प्रचार करत आहेत. कोणत्याही भेटवस्तू किंवा पैशांची मागणी न करता स्वखर्चाने प्रचार फेरीत सहभाग घेऊन आपल्या मराठी अस्मितेचे दर्शन घडविण्याचे कार्य सीमाबांधवांनी सुरू केले आहे. प्रत्येक गावामध्ये समिती उमेदवाराला मिळणारा मतदारांचा प्रतिसाद पाहून राष्ट्रीय पक्षातील उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. यावेळी मतदारांनी देखील युवकांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चौगुले यांनाच आपला पाठिंबा जाहीर करून सदैव समितीच्या पाठीशीच राहणार असल्याची ग्वाही दिली.









