वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्या पॅरिस दौऱ्याला अनुमती नाकारण्यात आली आहे. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट असे सहा दिवस पॅरिसला जाण्याची त्यांची योजना होती. पॅरिसमध्ये सध्या ऑलिंपिक क्रिडा स्पर्धा होत असून ती पाहण्यासाठी मान जाणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या काळात ते भारतीय संघाचा हॉकी सामनाही पाहणार होते. नुकताच भारतीय संघाने तब्बल 52 वर्षांनंतर ऑस्टेलियाच्या बलाढ्या संघाचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
मान यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. तथापि, त्यांनी राजकीय पासपोर्टसाठी अनुमती मागितली होती. तथापि, केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी अनुमती नाकारली आहे. मान यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. अशा दर्जाची सुरक्षा त्यांना विदेशात देणे इतक्या कमी वेळेत शक्य नाही. पॅरीसला जाण्यासाठी त्यांनी किमान महिनाभर आधी अनुमती घ्यावयास हवी होती. त्यांना सुरक्षेविना किंवा कमी श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था देऊन विदेशात दौऱ्यावर नियमानुसार पाठविता येत नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मान यांचा पॅरिस दौरा आता बारगळला असल्याचे स्पष्ट होत आहे.









