राज्यभरात प्रक्षेपणाची व्यवस्था : सदानंद तानावडे यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
’मन की बात’ या आपल्या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. येत्या रविवारी 30 एप्रिल रोजी प्रसारित होणारा हा शतकमहोत्सवी भाग असून त्याद्वारे देशभरातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजपने जय्यत तयारी केली आहे. त्यासंदर्भात गोव्यातही जवळजवळ सर्वच मतदारसंघात प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली असून 1722 पैकी 1250 बुधवरून हजारो गोमंतकीय या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.
गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस दामू नाईक यांचीही उपस्थिती होती.
पक्षाचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील. खासदार विनय तेंडुलकर फोंडा येथे तर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक पर्वरी येथील कार्यक्रमास उपस्थित असतील. पणजी मुख्यालयातही हा कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
वर्ष 2014 पासूनचा उपक्रम
वर्ष 2014 पासून पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुऊवात केली. या कार्यक्रमातून देशाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्याची माहिती स्वत: पंतप्रधान देशावासीयांना देतात. त्याअंतर्गत आतापर्यंत त्यांनी कावी चित्रकार सागर मुळे, गोव्यात आयोजित ’पर्पल महोत्सव’ तसेच रांगोळी कलाकार दत्तगुऊ वांतेकर, आदींचा उल्लेख केला होता, असे तानावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र, गुजरातचे स्थापना दिन
मन की बातच्या थेट प्रक्षेपणासह त्याच दिवशी ’एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचेही स्थापना दिवस साजरे करण्यात येणार आहेत. त्यानिमित्त पणजीतील सम्राट थिएटरमध्ये नव्याने उभारलेल्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे तानावडे म्हणाले.









