वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अस्थींचे रविवार, 29 डिसेंबर रोजी शीख प्रथेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी मजनू का तिला गुरुद्वाराजवळील यमुना नदीत विसर्जन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी निगमबोध घाटातून अस्थी गोळा केल्यानंतर गुरुद्वाराजवळील यमुना नदीच्या काठावर असलेल्या ‘अष्ट घाट’ येथे नेले. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्यासह उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग ह्या तीन मुली आणि इतर नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबरच्या रात्री ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे निधन झाले होते. त्यानंतर शनिवारी त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता शीख रीतिरिवाजानुसार पुढील विधी केले जात आहेत. 1 जानेवारीला मोतीलाल नेहरू मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘अखंडपाठ’चे आयोजन करण्यात येणार आहे. 3 जानेवारी रोजी संसद परिसराजवळील रकाबगंज गुरुद्वारा येथे भोग, अंतिम प्रसाद आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.









