प्रतिनिधी /पणजी
राज्यात मानकुराद आंब्याचे बंपर पीक आले असून पणजी बाजारपेठ ही आंब्यासाठीची गोव्यातली सर्वांत मोठी बाजारपेठ मानली जाते. इथे आंब्यांचे दर सध्या धडाधड कोसळू लागले आहेत. सध्या 350 ते 550 या दराने मानकुराद आंब्यांची विक्री होत आहे.
राज्यात आंब्यांचे बंपर पीक आलेले असून वादळे आणि पाऊस यांच्यापासून वाचलेले आंबे राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये पोहोचले आहेत. आंब्यासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ ही पणजीची असून सध्या चोडणच्या मानकुराद आंब्याला सर्वाधिक भाव प्राप्त झालेला आहे. यावर्षी मोठय़ा प्रमाणात आंबे तयार झालेले आहेत. त्यामुळे गेल्या आठवडय़ात प्रती डझन रु. 1200 पर्यंतचा जो दर होता तो आता चांगल्या प्रतीच्या मानकुरादचा दर प्रतीडझन रु. 550 एवढा झालेला आहे. पणजी बाजारात पहाटेच्या समयी होलसेल तराने आंब्यांची विक्री होत असते.
सध्या पणजी बाजारात सकाळच्या प्रहरी रु. 300 पासून ते चांगल्या प्रतीच्या मानकुरादचा दर रु. 550 पर्यंत पोहोचलेला आहे. घावूक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून आंब्यांचे दर आणखी खाली अतरण्याची शक्यता आहे. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात मानकुराद आंबे तयार झाल्याने दर खाली कोसळू लागलेत. मेच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत मानकुरादची आवक वाढलेली असेल. गोमंतकीय आम्रखवय्यांसाठी मानकुरादचे दर खाली उतरणे ही पर्वणी ठरणार असली तरी बागायतदारांना मात्र त्याचा थेट फटका बसण्यास प्रारंभ झाला आहे.









