नैसर्गिक पिकलेले आंबे मिळणे आता दुरापास्त
प्रतिनिधी / पणजी
पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव आदी शहरांतील बाजारपेठांमध्ये सध्या अर्धवट हिरव्या आणि किंचित पिवळसर रंगाचे मानकुराद आंबे विक्रीस उपलब्ध झाले असून या आंब्यांबाबत संशय निर्माण झाला आहे. हे आंबे रसायनांमध्ये बुडवून कृत्रिम पद्धतीने पिकवलेले असून अद्याप अन्न व औषध संचालनालयाने कारवाई सुरू केलेली नाही. त्यामुळे गोव्याच्या आंब्याची लज्जत मिळणे आता कठीण होऊन बसले आहे. हे अर्धे कच्चे आंबे आरोग्यास अपायकारक तर नाहीत ना? असा प्रश्न उद्भवला आहे. राजधानी पणजीसह गोव्यातील चार शहरांतील बाजारपेठांमध्ये अर्धे कच्चे मानकुराद आंबे विक्रीस आलेले आहेत. यापूर्वी बाजारपेठा या नेहमीच मानकुराद आंब्यांनी सजलेल्या असायच्या. मात्र, कधीही मानकुराद आंबे हिरवट रंगाचे पाहिले नव्हते. मानकुरादचा दरवळ सर्वत्र सुटत असे. आताशा पणजी असो वा फोंडा, म्हापसा वा मडगावच्या बाजारपेठांमध्ये मानकुराद आंबे हिरव्या व किंचित पिवळ्या रंगाचे येत असून त्यांना आंब्याचा येणारा घमघमाट नाही. झाडावरून पक्ष्यांनी खाऊन काही आंबे गळायला लागल्यानंतर मानकुराद तयार होतो हे गोव्यातील सर्वसामान्य बागायतदार व शेती उत्पादक जाणतात. त्यानंतर आंबा उतरवून तो गवताच्या गादीवर पिकविण्यासाठी ठेवला जातो. आठ दिवसांनंतर पिवळाधमक असलेला हा आंबा बांबूच्या पाटल्यामध्ये गवत टाकून त्यावर रचवून ठेवून बाजारपेठेत विक्रीस येत असतो. परंतु, यंदा ही प्रथा मोडली आहे. हापूस आंबा नावाचा एक प्रकार सध्या महाराष्ट्रातून गोव्यात येत आहे. हा आंबा तयार झालेला नाही तर अर्धवट तयार झालेल्या कैऱ्या झाडावरून उतरवून केमिकलमधून काढलेले किंवा रासायनिक प्रक्रिया करून विक्रीस आणले जात आहेत.

मानकुरादाची क्रूर थट्टा, बदनामी
गोव्यात आंब्याचा मौसम अद्याप सुरू झालेला नाही. तो एप्रिलच्या अखेरीस सुरू होईल. परंतु हापूस रासायनिक प्रक्रियेतून बाजारात येतो, त्याच धर्तीवर गोव्यातील काही बागायतदारांनी परगावातून येणाऱ्या कंत्राटदाराना झाडे फळ तोडण्यासाठी काही रकमेच्या बोलीवर दिलेली आहेत, ते कंत्राटदार चांगला दर यावा म्हणून मानकुरादच्या पक्क्या न झालेल्या कैऱ्या काढून रासायनिक प्रक्रियेतून आंबे म्हणून विक्रीस आणत आहेत. त्यातून गोव्याच्या खऱ्या मानकुरादची क्रूर थट्टा तर होतच आहे शिवाय त्याची बदनामीही होतेय.
नैसर्गिकपणे पिकवलेला आंबा नव्हे
हा मानकुराद खरोखरच खाण्यास योग्य आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मानकुरादवर प्रेम करणारी मंडळी हे आंबे खरेदी करतात व फसतात. सुरुवातीला गोड लागतो व आतून आंबट अशी या आंब्याची अवस्था आहे. या गडबडीत खरा मानकुराद यंदा गोमंतकीयांना खायला मिळेल का? असा प्रश्न आहे. सध्या डझनाला किमान 1 हजार ते 1400 असा मानकुरादचा दर असला तरी तो नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा नव्हे हे पाहिल्यानंतरही लक्षात येते. अर्धवट हिरवा पिवळसर असा मानकुराद आजवर कधीही विक्रीस आला नव्हता. मात्र झटपट पैसा कमविण्यासाठी मानकुरादवर मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे व यातून या फळाच्या राजावर अत्याचार होत आहे. त्याचबरोबर खरे मूळ गोमंतकीय हे आंबे खरेदी करण्यास राजी होत नाहीत. अद्याप पक्क्या न झालेल्या कैऱ्या तोडून रासायनिक प्रक्रियेद्वारे आंबे पिकवले जात असल्याने ऐन मोसमापर्यंत मानकुराद आंबा राहील का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याहीपेक्षा अशा पद्धतीने रासायनिक प्रक्रियेने पिकवलेले आंबे सेवन करणाऱ्यांचे आरोग्य बिघडू नये अशीच प्रार्थना करावी लागेल. अलिकडेच मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रियेतून पिकवलेली केळी अन्न व औषध संचालनालयाने जप्त केली होती. आता बाजारातील आंब्यांची तपासणी केली जाईल का? असा प्रश्न अनेक बागायतदार उत्पादकांनी केला आहे.









