महाआघाडीतून बाहेर पडण्याचा ‘हम’चा निर्णय
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष अन् माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यावर शुक्रवारी निशाणा साधला. मांझी हे भाजपच्या संपर्कात होते. महाआघाडीसंबंधी ते भाजपला पूर्ण माहिती पुरवत होते. आमची रणनीति ते भाजपसमोर उघड करत होते. मांझी यांचा पक्ष महाआघाडीतून बाहेर पडला हे आमच्यासाठी उत्तमच झाल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
मांझी यांना त्यांचा पक्ष संयुक्त जनता दलात विलीन करण्याची सूचना केली होती. एक तर पक्ष विलीन करा किंवा महाआघाडीतून बाहेर पडा असे त्यांना सांगितले होते. मांझी यांनी पक्ष विलीन करण्यास नकार देत महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष मांझी यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याप्रकरणी नितीश यांनी शुक्रवारी स्वत:ची भूमिका मांडली आहे. 23 जून रोजी पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. जीतनराम मांझी महाआघाडीत राहिले असते तर बैठकीतील चर्चेची माहिती त्यांनी भाजपला पुरविली असती. याचमुळे मांझी यांना स्वत:चा पक्ष संयुक्त जनता दलात विलीन करण्याचा किंवा सरकारमधून बाहेर पडण्याची सूचना केली होती. महाआघाडीत असतानाही मांझी हे भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. मांझी हे महाआघाडीतून बाहेर पडतील याची कल्पना आम्हाला होती असा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले गेले. भाजपने काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. भाजपने पाठिंबा देण्याऐवजी विरोधात काम केल्याचे आमच्या पक्षाच्या उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले होते. तरीही आम्ही भाजपसोबत राहिलो, परंतु अखेरीस रालोआतून बाहेर पडलो असे नितीश यांनी म्हटले आहे.









