ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून अनेक आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली. आता आमदार मनिषा कायंदे यांनीही ठाकरे गटाला रामराम केला आहे. आज त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबीर पार पडणार आहे. त्याआधीच आ. मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. काल शिशिर शिंदे यांनीही उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. आज या दोघांसह अन्य दोन माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.








